सातशेवर तळीरामांचे वाहन परवाने निलंबित
By Admin | Updated: November 17, 2014 23:21 IST2014-11-17T23:11:03+5:302014-11-17T23:21:09+5:30
मद्यधुंद सवारी भोवली : पोलिसांच्या प्रस्तावानुसार कारवाई

सातशेवर तळीरामांचे वाहन परवाने निलंबित
सचिन लाड - सांगली -दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांना न्यायालय व उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी कारवाईसाठी सादर केलेल्या प्रस्तावातील ७०० तळीरामांचा वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) निलंबित केला आहे. न्यायालय व आरटीओंनी स्वतंत्रपणे दोन ते सहा महिन्यांपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तळीरामांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अपघात होतात. वाहनधारक स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकतात. अनेक अपघात वाहनधारक नशेत असल्यामुळेच झाले आहेत. नशेत वाहन चालविणे धोक्याचे असूनही वाहनधारक सर्रासपणे हा धोका पत्करतात. नेहमीपेक्षा ते भरधाव वेगाने जातात. त्यांच्या नशेतील सवारीला ‘ब्रेक’ बसावा, या हेतूने जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दोन वर्षांपूर्वी विशेष मोहीम उघडली. तळीरामांची वाहने जप्त केली जातात. रात्रभर त्यांना पोलीस कोठडीत ठेवले जाते. दुसऱ्यादिवशी दुपारी तीन वाजता न्यायालयात उभे केले जाते. त्यांचे लायसन्सही जप्त केले जाते. या कारवाईमुळे अपघातासह अन्य गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसल्याचे दिसून येते. पोलीस कधीही नाकाबंदी लावून धरपकड करीत असल्याची भीती मद्यपींमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे रात्री दहानंतर रस्त्यावर शुकशुकाट असतो.
पूर्वी दारूचे सेवन केले आहे का नाही, याची तपासणी करण्यासाठी वाहनधारकास शासकीय रुग्णालयात नेले जात होते; मात्र आता पोलिसांकडे अत्याधुनिक नऊ यंत्रे आली आहेत. हे यंत्र वाहनधारकाजवळ नेल्यानंतर त्याने दारूचे सेवन केले आहे का नाही, हे लगेच समजते.
गेल्या वर्षभरात पोलिसांनी ७०० तळीरामांना अटक केली. त्यांचे लायसन्स निलंबित करावे, असा एकत्रित प्रस्ताव जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी तत्कालीन आरटीओ हरिश्चंद्र गडसिंग यांना सादर केला होता. गडसिंग यांनी स्वत: यातील सहाशे जणांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. उर्वरित १०४ जणांचे प्रस्ताव जिल्हा न्यायालयात पाठविण्यात आले होते.
आता लायसन्स रद्द होणार
अनेक तळीराम दोन ते तीनवेळा सापडले. त्यांचे लायसन्सही निलंबित करण्यात आले होते. मात्र तरीही ते पुन्हा नाकाबंदीत सापडत आहेत. त्यामुळे आता त्यांचे लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी पोलीसप्रमुखांचा विचार सुरू आहे. गेल्या दोन वर्षात तीन ते चारवेळा सापडलेल्या तळीरामांचे रेकॉर्ड काढण्याचे काम सुरू आहे.