ठेकेदाराला अभय देण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: December 26, 2014 00:13 IST2014-12-25T22:52:01+5:302014-12-26T00:13:38+5:30

आंदोलनाचा इशारा : पोषण आहाराची माहिती मागविली

Trying to abort the contractor | ठेकेदाराला अभय देण्याचा प्रयत्न

ठेकेदाराला अभय देण्याचा प्रयत्न

मालगाव : मिरज तालुक्यातील शाळांमधून देण्यात आलेल्या निकृष्ट पोषण आहाराची माहिती मिरज पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने मागवली आहे. माहिती मागवताना या विभागाने मुख्यत: निकृष्ट कडधान्यांचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला जबाबदार न धरता, त्याला अभय देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई न केल्यास शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निकृष्ट कडधान्ये शिक्षण विभागात टाकण्याचा इशारा दिला आहे.
मिरज तालुक्यात पोषण आहारासाठी जनावरेसुध्दा तोंड लावणार नाहीत, अशा निकृष्ट व दर्जाहीन कडधान्यांचा पुरवठा केला आहे. ‘लोकमत’ने हा प्रकार उजेडात आणल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आली. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी निकृष्ट पोषण आहार ताब्यात न घेण्याचा आदेश दिला, शिवाय पोषण आहारातील कडधान्यांच्या दर्जाची तालुक्यातील शाळांकडून माहिती मागविली आहे. माहिती मागवताना त्यांनी निकृष्ट धान्य का स्वीकारले, असा जाबही मुख्याध्यापकांना विचारला आहे. शिक्षण विभागाच्या या भूमिकेवरून ठेकेदाराला
पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. ठेकेदाराकडून निकृष्ट कडधान्याचा पुरवठा होत आहे.
यापूर्वी शाळांनी निकृष्ट धान्य नाकारल्यामुळे ठेकेदारांनी वेळेत पुरवठा करण्यात अडवणूक केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहा ते पंधरा दिवस पोषण आहारापासून वंचित राहावे लागले.
निकृष्ट धान्याबाबत जाब विचारल्यास पुरवठादाराकडून शिक्षकांनाच दमबाजी होत असल्याच्या तक्रारी आहेत. सध्या तर अतिनिकृष्ट कडधान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ठेकेदाराविरुध्द कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांनी दिला आहे. (वार्ताहर)


केंद्राची तपासणी करा!
मिरज तालुक्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या निकृष्ट पोषण आहाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी ठेकेदार जेथून वस्तूंची खरेदी करतात, त्या खरेदी केंद्रावर छापा टाकून तपासणी करावी. त्यामुळे गौडबंगाल चव्हाट्यावर येऊ शकते. याप्रश्नी अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालतात, की कारवाई करतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Trying to abort the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.