महाआरोग्य शिबिरातून आष्ट्यात रणशिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2016 00:27 IST2016-09-10T23:51:28+5:302016-09-11T00:27:04+5:30
पालिकेसाठी विरोधक एकवटले : आज राजू शेट्टी, प्रतीक पाटील यांची उपस्थिती

महाआरोग्य शिबिरातून आष्ट्यात रणशिंग
सुरेंद्र शिराळकर -- आष्टा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी माजी मंत्री आ. जयंत पाटील व माजी आमदार विलासराव शिंदे गटात धुसफूस सुरू असताना, आष्ट्यातील सर्व पक्षाचे नेते एकत्र येऊन स्थापन केलेल्या आष्टा शहर लोकशाही आघाडीने मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करीत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. याचे उद्घाटन खासदार राजू शेट्टी व माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्याहस्ते आज, रविवारी होत आहे. यानिमित्ताने सर्व विरोधक सत्तांतरासाठी एकवटल्याने वातावरण तापले आहे.
आष्टा नगरपालिकेची स्थापना ६ डिसेंबर १८५३ मध्ये झाली. पालिकेने गतवर्षी १६१ वा वर्धापन दिन साजरा केला. यातील प्रारंभीची काही वर्षे वगळता विलासराव शिंदे, दिवंगत राजारामबापू पाटील, आ. जयंत पाटील गटाची पालिकेवर सत्ता राहिली आहे. मागील अनेक वर्षे शिंदे गटाची एकहाती सत्ता आहे. २००६ ची पालिका निवडणूक बिनविरोध झाली. त्यावेळी फक्त शिवसेनेच्या विनायक इंगवले यांना नगरसेवकपदाची संधी मिळाली. मात्र पालिकेत पाटील-शिंदे गटाव्यतिरिक्त कोणासही संधी मिळालेली नाही. २०११ ची पालिका निवडणूक प्रारंभी अटीतटीची होईल, असे चित्र असताना, मतदान दोन दिवस पुढे गेल्याने सत्ताधारी गटास फोडाफोडीस वेळ मिळाल्याने विरोधकांना एकही जागा मिळाली नाही.
विरोधक वेगवेगळे लढल्याने त्याचा फायदा सत्ताधारी गटाला झाला. विरोधकांची एकूण टक्केवारी जास्त असूनही, सत्ताधारी गटास पुन्हा संधी मिळाली होती. राहुल थोटे, वीर कुदळे, अमोल पडळकर, लता पडळकर, गुंडाभाऊ आवटी यांचा विजय थोडक्यात हुकला होता. वेगवेगळे लढल्याने विजय हातातून निसटलेल्या विरोधकांनी धडा घेत यंदा एकत्र येण्याचा निश्चय केला व त्यांनी आष्टा शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे.
कॉँग्रेसचे राहुल थोटे, माजी नगरसेवक अमोल पडळकर, अण्णासाहेब मालगावे, अशोक हिरुगडे, बाबासाहेब कुलकर्णी, शिवसेनेचे पोपट भानुसे, वीर कुदळे, हणमंत सूर्यवंशी, मनसेचे राजकुमार सावळवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गुंडाभाऊ आवटी, भाजपचे डॉ. सतीश बापट, आरपीआयचे प्रदीप आवळे यांच्यासह दिलीप कुरणे, बी. एल. पाटील यांनी पालिकेचा किल्ला सर करण्यासाठी आघाडीची स्थापना केली आहे.
सगळे विरोधक एकत्र
रविवार, दि. ११ रोजी श्रीराम सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग, नेत्ररोग, कर्करोग, मूतखडा, कान नाक, हाडांची तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. श्रवणयंत्र वाटप होणार आहे. रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना एक लाखाचा मोफत विमा देण्यात येणार आहे. खासदार राजू शेट्टी, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल महाडिक, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, शिवसेनेचे माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत उपस्थित राहणार असून, महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने विरोधक पालिकेचे रणशिंग फुंकत आहेत.