मिरजेत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सुधार समितीचे खड्ड्यात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:39+5:302021-06-18T04:18:39+5:30
मिरज : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची पावसाने मोठी दुरवस्था झाली असल्याने नवीन रस्ता होईपर्यंत रस्त्यावरील खड्डे ...

मिरजेत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सुधार समितीचे खड्ड्यात वृक्षारोपण
मिरज : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची पावसाने मोठी दुरवस्था झाली असल्याने नवीन रस्ता होईपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी चौकातील खड्ड्यात अधिकाऱ्यांच्या नांवे झाडे लावून आंदोलन केले. रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका अधिकाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २९ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर केला आहे. काम सुरू होण्यास किमान सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे. पावसाळ्यात किमान खड्डे मुजवून रस्ता तात्पुरता दुरुस्तीची मागणी शहर सुधार समितीने केली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांच्या नावे बोंबाबोंब आंदोलन केले.
आंदोलनात समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, मुस्तफा बुजरूक, धनराज सातपुते, बाळासाहेब पाटील, विराज कोकणे, बंडू शेटे, विलास देसाई, किरण बुजुगडे, विजय धुमाळ, श्रीकांत महाजन, असिफ निपाणीकर, राकेश तामगावे, संतोष माने, जहीर मुजावर, इम्रान मर्चंट, यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दरम्यान, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले.