मिरजेत उमेदवार निवडीचे त्रांगड
By Admin | Updated: September 17, 2014 23:05 IST2014-09-17T22:50:27+5:302014-09-17T23:05:17+5:30
राष्ट्रवादी, रिपाइंचा बंडाचा पवित्रा : भाजप-शिवसेनेत बेदिली कायमे

मिरजेत उमेदवार निवडीचे त्रांगड
सदानंद औंधे - मिरज =मिरज विधानसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत अद्याप अनिश्चितता आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने काँग्रेस उमेदवार कोण, यावरच निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी इच्छुकांनी बंडखोरीची तयारी सुरू केली असून, महायुतीतील शिवसेनेने पुन्हा मतदारसंघावर हक्क सांगितल्याने व रिपाइंने बंडखोरी जाहीर केल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. शिवसेना आणि भाजपमधील बेदिलीचा यंदा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच गेले वर्षभर काँग्रेसच्या इच्छुकांनी स्थानिक, बाहेरचा असा वाद निर्माण करून वातावरण तापविले आहे. प्रत्येकाने आपापल्या नेत्यांकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली असल्याने काँग्रेसच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार व उमेदवारी मिळाली नाही, तर बंडखोरीचा इशारा देणाऱ्या इच्छुकांपैकी कितीजण मैदानात टिकणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादीचे नेतेही काँग्रेस बंडखोरांना प्रोत्साहन देत आहेत. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेशोत्सवात झालेल्या दंगलीचा फायदा होऊन भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर गेल्या पाच वर्षात राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेना कार्यकर्ते भाजपसोबत फटकून आहेत. शहरात शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपशी फटकून असल्याने व मिरज पूर्वभागातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावरून मतदार नाराज असल्याने, त्याचा भाजपला फटका बसणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. मिरज मतदारसंघात शिवसेनेचे बजरंग पाटील यांनी दोनवेळा चांगली लढत दिली होती. मात्र मतदारसंघ राखीव झाल्यानंतर २००९ मध्ये भाजपकडे गेला. यावेळी शिवसेनेने पुन्हा मतदारसंघावर हक्क सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेतील बेदिली दिसून आली होती. भाजप, सेना पदाधिकारी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याच्या कारणावरून रिपाइं बंडाचा झेंडा फडकविण्याच्या पवित्र्यात आहे. रिपाइंने अशोक कांबळे यांची मिरजेतून उमेदवारी जाहीर करून युतीच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. मिरज पूर्वभागात अजितराव घोरपडे यांच्या गटाच्या मदतीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे मताधिक्य मिळाले. आता घोरपडे यांनी भाजपप्रवेश केला आहे. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता असल्याने, बंडखोर उमेदवार देण्याच्या हालचाली राष्ट्रवादीत सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, महेश कांबळे यांच्यासह काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे यांनी बंडखोरी केल्यास त्यांना राष्ट्रवादीची रसद देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या इच्छुकांची बंडखोरी काँग्रेसला अडचणीची ठरणार आहे. मात्र महायुतीतील घटक पक्षांतील समन्वयाचा अभाव व रिपाइंची बंडखोरी हीसुद्धा भाजप उमेदवारासाठी अडथळा आहे. इच्छुकांची मोठी संख्या व पाडापाडीच्या राजकारणाचा ‘मिरज पॅटर्न’ यामुळे मिरज विधानसभेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
ओवेसींचाही उमेदवार
मिरज शहरात अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठी असल्याने त्यांची मते काँग्रेसला मिळू नयेत यासाठी ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ या पक्षाच्या उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी काही नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेस विरोधकांच्या या खेळीबाबत आणि ही खेळी यशस्वी होणार का, याबाबत नेतेमंडळींत चर्चा सुरू आहे.
गत विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आ. खाडे यांचा उघड प्रचार केला होता. मात्र गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या कारणांमुळे घोरपडे व खाडे यांचे सख्य असल्याचे दिसले नाही. घोरपडे यांनी आता भाजपप्रवेश केला असला तरी, त्यांचा गट राष्ट्रवादी बंडखोराच्याच पाठीशी असल्याचा दावा राष्ट्रवादी कार्यकर्ते करीत आहेत. कोणाला कोणाची छुपी रसद आहे, हे निवडणूक प्रचार सुरू झाल्यानंतरच उघड होणार आहे.