डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:54+5:302021-02-05T07:31:54+5:30
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. या आठवड्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीने, तर कहरच केला आहे. सध्या ...

डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. या आठवड्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीने, तर कहरच केला आहे. सध्या जवळपास ९२.८२ रुपये प्रतिलिटर पेट्रोल, तर डिझेलही ८२.०३ रुपयांवर पोहोचले आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे होणाऱ्या विविध कामांचीदेखील भाडेवाढ झाली आहे. मशागतीसाठी लागणाऱ्या वाहनांचे दर डिझेल दरवाढीमुळे अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे अत्याधुनिक पद्धतीने शेती मशागत करण्यासाठी मागील वर्षापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा इंधन दरवाढीमुळे उत्पादन खर्च जास्त वाढला आहे.
चौकट
मशागतीचे एकरी दर
२०२० २०२१
-नांगरणी २००० २६००
-रोटावेअटर २००० २६००
-खुरटणी १००० १५००
-सरी पाडणी १००० १६००
-पेरणी १३०० १५००
पालकुटी २००० २५००
एकूण ९३०० १२३००
कोट
डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करणे परवडत नाही. ट्रॅक्टर चालकांनी २० ते २५ टक्के दरात वाढ केली आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च वाढला आहे. शासनाने डिझेल आणि पेट्रोलच्या दरावर नियंत्रण ठेवले नाही तर शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
-धनाजी माळी, शेतकरी.
कोट
डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढले आहेत. डिझेल दरवाढ, बँकेचे हप्ते आणि चालकाचा पगाराचा खर्च लक्षात घेता ट्रॅक्टर चालकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना परवडत नाही हे खरे आहे. पण, यावर शासनानेच डिझेलवरील कर कमी करून दरात कपात करण्याची गरज आहे. तरच ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर कमी होणार आहेत.
- शिवाजी पाटील, ट्रॅक्टर मालक.
कोट
केंद्रातील भाजप सरकार भांडवलदारांचे हित पाहत आहे. शेतकरी आणि सामान्य जनतेचे दु:ख त्यांना कधीच समजणार नाही. शेतीत अभियांत्रिकीकरण आले पाहिजे म्हणायचे आणि डिझेल, पेट्रोलच्या किमती वाढवायच्या हे धोरणच चुकीचे आहे. केंद्राच्या या धोरणामुळेच शेतकरी फार मोठ्या आर्थिक संकटात आहे.
-संतोष जाधव, शेतकरी.