चिमटे, टोलेबाजीने गाजली अभिरूप महासभा

By Admin | Updated: February 12, 2015 00:37 IST2015-02-11T22:37:52+5:302015-02-12T00:37:06+5:30

महापालिका वर्धापन दिन : व्यापाऱ्यांचा सत्कार; मानधनवाढीवर एकमत!

Tongs, towels, Gazli Abirup Mahasabha | चिमटे, टोलेबाजीने गाजली अभिरूप महासभा

चिमटे, टोलेबाजीने गाजली अभिरूप महासभा

सांगली : महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित अभिरूप महासभेत आज (बुधवारी) पदाधिकारी, अधिकाऱ्यांत चांगलीच जुगलबंदी रंगली. काळ्या खणीत हेलिकॉप्टर, मिरज पॅटर्नचा जागतिक पातळीवरील गाजावाजा, सांगलीत समुद्र असे अनेक किस्से घडल्याने सभागृहात हास्याचे कारंजे उडाले. अधिकाऱ्यांनी नगरसेवकांची नक्कल करीत चिमटे काढले, तर पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची हुबेहुब नक्कल करीत टोलेबाजी केली. अभिरूप महासभेत अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेत, तर पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेत असतात. आयुक्त म्हणून महापौर विवेक कांबळे पीठासनावर होते, तर उपायुक्त ओमप्रकाश दिवटे महापौरांच्या भूमिकेत होते. नगरसचिव म्हणून राजेश नाईक, शहर अभियंता किशोर जामदार,आरोग्याधिकारी प्रशांत पाटील-मजलेकर, वैद्यकीय आरोग्याधिकारी रोहिणी पाटील यांनी आपापल्या भूमिका चांगल्या पद्धतीने वटविल्या. अगदी टक्केवारी, पाकिटापर्यंत चर्चा रंगली होती! विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेत सहायक आयुक्त सुनील नाईक होते.कलम ४४ खाली प्रश्नांत काळ्या खणीत हेलिकॉप्टर उतरविण्यावरून सभेत रंगत आली. किशोर जामदार यांनी हेलिकॉप्टरला किती पंखे आहेत, ते उरूसातून खरेदी केले की जत्रेतून, याचा खुलासा न केल्याने सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले नसल्याचे सांगितले. राजेश नाईक यांनी खणीतील डास पंख्याच्या आडवे येत असल्याने हेलिकॉप्टर उतरविले नसल्याचे सांगितले. डासांवरून आरोग्य विभागावर विषय गेला. आरोग्याधिकारी आंबोळे यांच्या भूमिकेतील प्रशांत मजलेकर म्हणाले की, मी काम करीत असून, तीनदा निलंबित केले, पण कर्मचारीच कमी असल्याने पुन्हा कामावर आलो.कर्मचारी कमी का आहेत, यावर किशोर जामदारांनी टोलेबाजी केली. २५ टक्के कर्मचारी अधिकाऱ्यांच्या घरी, तर २५ टक्के कर्मचारी नगरसेवकांच्या घरात कामाला असतात. त्यामुळे त्यांचा पगार काढावाच लागतो, असे त्यांनी म्हणताच हशा पिकला. आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता यांच्या घरी कर्मचारी काम करतात, असे सांगत जामदार यांनी त्यांची नावेच जाहीर केली. गत अभिरूप सभेत सांगलीत समुद्र आणण्याचा ठराव झाला होता. त्यावर काय झाले, असा सवाल विकास पाटील यांनी केला. विवेक कांबळे यांनी सध्या वाळू टाकण्याचे काम सुरू असून, नाला बाजूला सारुन समुद्र आणला जाईल, असे स्पष्ट केले. शिवाय व्हॅलेन्टाईन डे असल्याने वाळू टाकावीच लागेल, असा चिमटा काढला.
व्यापाऱ्यांनी एलबीटी भरल्याने पालिकेच्या तिजोरीत अतिरिक्त पैसा जमा झाला आहे. तो खर्च करण्यासही जागा नाही. नागरिकांची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा पैसा नगरसेवकांच्या नावाने सदाबंद बँकेत ठेवावा, असा ठराव चंद्रकांत आडके यांनी मांडला. व्यापाऱ्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचा सांगली, मिरज, कुपवाड व विश्रामबाग येथील विविध चौकात सत्कार व मानपत्र देण्यासही सभेत मंजुरी देत व्यापाऱ्यांवर निशाणा साधला. शेवंता वाघमारे व डॉ. रोहिणी कुलकर्णी यांच्यात वादावादी झाली. विवेक कांबळे यांनी हा घरगुती वाद असून, तो घरीच मिटवा, असा टोला लगाविला. एलबीटी, जकातीतून सदस्यांना पाकिटे दिली जातात इथपासून ते निवडून येण्यासाठी ‘कोट’ खर्च केल्यापर्यंत अनेक विषयांवर एकमेकांना चिमटे घेण्यात आले. (प्रतिनिधी)

मगरीचे नाक... इस्लामपूर उड्डाणपूल
कृष्णा नदीत मगर शोधण्यासाठी अमेरिकेतून पाणबोटी मागविण्यात आल्याचे जामदार म्हणाले. यावेळी अमेरिकेतून बोटी कशासाठी, असा सवाल केला. विवेक कांबळे यांनी अमेरिकन नागरिकांचे व मगरीचे नाक यांच्यात साम्य असल्यानेच त्यांच्या पाणबोटी मागविल्याचे सांगितले.
इस्लामपूर ते मिरज उड्डाणपूल का झाला नाही, असा सवाल विकास पाटील यांनी केला. त्यावर किशोर जामदार म्हणाले की, इस्लामपूर ते मिरज या दरम्यान कृपामयी रुग्णालय आहे. या पुलावर येणारे लोक कृपामयीत उतरतील, म्हणून पूल बांधला नसल्याचे सांगत चिमटा काढला.


मिरज पॅटर्न जागतिक स्तरावर
मिरज पॅटर्नवरही सभेत टोलेबाजी झाली. नगरसेवकांच्या प्रशिक्षणासाठी मिरज शहरात केंद्र करण्याचा विषय अजेंड्यावर होता. त्यावर मिरज पॅटर्नचा बोलबाला केवळ देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर आहे. ओबामा यांनीही मिरजेच्या लोकांचे मेंदू तपासण्याचे आदेश पंतप्रधानांना दिले आहेत. या शहरात अकरा वेड्यांची रुग्णालये आहेत. त्यामुळे सरकारने नगरसेवकांच्या प्रशिक्षणासाठी मिरजेची निवड केल्याचे जामदार म्हणताच हशा पिकला

Web Title: Tongs, towels, Gazli Abirup Mahasabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.