साखर कारखान्यांच्या फडात टोलवाटोलवी

By Admin | Updated: September 28, 2015 23:49 IST2015-09-28T23:11:44+5:302015-09-28T23:49:19+5:30

ऊस उत्पादक वाऱ्यावर : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि दुर्लक्ष; गळीत हंगामाचे भवितव्य अधांतरीच

Tollwatolvi in ​​the factory of sugar factories | साखर कारखान्यांच्या फडात टोलवाटोलवी

साखर कारखान्यांच्या फडात टोलवाटोलवी

अशोक पाटील - इस्लामपूर -मंत्रीपदासाठी भाजपचे उंबरठे झिजविणाऱ्या शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत नाटकी असल्याचा आरोप करून, उसाला दर मिळविण्यासाठी कारखाने बंद पाडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला. त्याचवेळी साखर उद्योग तोट्यात आणण्यास केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचे सांगून, साखरेचे दर वाढत नाहीत तोपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय आमदार जयंत पाटील यांनी घेतला आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी खासगीकरणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांचा सच्चा नेता कोण?, असा सवाल उपस्थित होत आहे.दोन वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पेटवले होते. अखेरच्या टप्प्यात उसाच्या दराचा तिढा कोल्हापूरच्या कारखान्यांनी सोडविला. याचा काहीसा राग सांगली जिल्ह्यातील अनेक कारखाने हातात असणाऱ्या आमदार जयंत पाटील यांच्या मनात होता. त्यामुळे तीन हजार रुपये दर मिळाल्याशिवाय संघटनेने गळीत हंगाम सुरू करू देऊ नये, असे आव्हानच त्यांनी दिले होते.मागील गळीत हंगाम शांतपणे पार पडला. याला कारणही तसेच होते. एरव्ही ऊस दरासाठी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत भाजपच्या वळचणीला जाऊन बसले होते. त्यांना मंत्रीपदाचे गाजर दिसत असल्यानेच त्यांनी गतवर्षी आंदोलन न करणे पसंत केले. शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी ऊस उत्पादकांच्या दरासाठी भांडण्याऐवजी स्वाभिमानीच्या नावाने खडे फोडले. त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे जयंत पाटील यांनी उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्यास असमर्थता दर्शवत, केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर खापर फोडले. शासनाच्या मदतीशिवाय एफआरपीची रक्कम देऊ शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील काही सहकारी कारखान्यांनी शासन धोरणाला कंटाळून खासगीकरणाचा इशारा दिला आहे.
याबाबत सदाभाऊ खोत यांच्याशी संंपर्क साधला असता ते म्हणाले की, सहकारी कारखान्यांमध्ये सभासद आणि सरकारचे भागभांडवल आहे. शेतकऱ्यांना दर मिळावा म्हणून राज्यात सहकारी साखर कारखानदारी उभी राहिली आहे. हा उद्योग खासगी उद्योजकांकडे गेला, तर ऊस उत्पादकांची वाट लागणार आहे. शेतकऱ्यांच्या ठेवी हडप करण्याचा डाव साखरसम्राटांचा आहे. जयंत पाटील यांना आता ऊस उत्पादकांचा पुळका आला आहे. त्यांनी उसाला दर मिळण्यासाठी कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे, तर त्यांच्याच शेजारचे शेतकरी संघटनेचे नेते एफआरपीसाठी कारखाने बंद करण्याचा इशारा देत आहेत. गेली २0 वर्षे आम्ही यासाठीच आंदोलने केली आहेत. आता त्याची जबाबदारी जयंत पाटील यांनी घेतली आहे, यातच शेतकरी संघटनेचा विजय आहे.
एकूणच साखर कारखान्यांच्या फडात नुसतीच टोलवाटोलवी सुरू आहे. नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी वाऱ्यावर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा मोर्चा'
कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर दिला आहे, तर सांगली जिल्ह्यातील साखरसम्राटांनी सहकारी कारखाने खासगी करण्याची भाषा सुरू केली आहे. त्यामुळे खा. शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना पुन्हा ऊस उत्पादकांचा कळवळा आला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचा मोर्चा कोल्हापूर येथील साखर उपसंचालकांच्या कार्यालयावर काढला जाणार आहे.

बघता बघता राज्यात खासगी साखर कारखान्यांची संख्या ५५ वर जाऊन पोहोचली आहे. सामान्य माणसाला सहकार हाच आधार आहे. साखरसम्राटांबरोबर आमचे मतभेद आहेत. परंतु सहकारी साखर कारखान्यावरील आमची निष्ठा कायम आहे. सहकारामध्ये वर्षातून एकदा सभासदाला मत मांडता येते. पाच वर्षातून एकदा मतदानाचा अधिकार मिळतो. कारखाने खासगी झाले, तर सभासदांचा आवाज दबला जाईल. साखरसम्राटांनीच कारखाने आजारी पाडायचे, त्यांनीच ते खरेदी करायचे, हा उद्योग बंद झाला पाहिजे.
- खासदार राजू शेट्टी

Web Title: Tollwatolvi in ​​the factory of sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.