पुढील आठवड्यातील निर्बंधांबाबत आज निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST2021-07-03T04:18:26+5:302021-07-03T04:18:26+5:30
सांगली : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चौथ्या स्तरात असलेल्या जिल्ह्यातील निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहण्याचीच शक्यता आहे. या आठवड्यात ...

पुढील आठवड्यातील निर्बंधांबाबत आज निर्णय
सांगली : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चौथ्या स्तरात असलेल्या जिल्ह्यातील निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहण्याचीच शक्यता आहे. या आठवड्यात सरासरी ९०० वर रुग्ण आढळल्याने पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षाही जादा असणार आहे. मात्र, तरीही सोमवार (दि. ५) पासून लागू असलेल्या नियमांबाबत जिल्हा प्रशासनाकडून आज, शनिवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गेल्या आठवड्यात दहा टक्क्यांपेक्षा जादा पॉझिटिव्हिटी रेटची नोंद झाल्याने सोमवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरातून चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला आहे. या आठवड्यातही रुग्णसंख्या कायम आहे. आठवड्यात दोन वेळा हजारावर रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा अधिकच असणार आहे. मात्र, प्रशासनाने या आठवड्यात चाचण्यांचे प्रमाणही वाढविले असल्याने पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून आरटीपीसीआरनुसार चाचण्यांद्वारे पॉझिटिव्हिटी रेटद्वारे निर्णय घेण्यात येणार आहे. शनिवारी याबाबतच्या कागदपत्रांची पडताळणी करून निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.