व्यापारी उद्योजकांचा आजबंद
By Admin | Updated: August 24, 2014 23:13 IST2014-08-24T22:45:25+5:302014-08-24T23:13:56+5:30
एलबीटीचा निषेध : आयुक्तांना दुकानाच्या किल्ल्या देणार

व्यापारी उद्योजकांचा आजबंद
सांगली : एलबीटी (स्थानिक संस्था कर) न भरणाऱ्या व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्याच्या महापालिका आयुक्त अजिज कारचे यांच्या कारवाईच्या निषेधार्थ उद्या (सोमवार) महापालिका क्षेत्रातील व्यापार एक दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारी रात्री झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर आयुक्तांच्या कारवाईच्या निषेधार्थ त्यांना दुकानांच्या किल्ल्या देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
एलबीटी न भरणाऱ्या ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती महापालिकेने सील केली असून, आणखी शंभर जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांची ही कृती हुकूमशाही पध्दतीची असल्याचे मत व्यापाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केले. बैठकीला समीर शहा, विराज कोकणे, अनंत चिमड, सचिन पाटील, सोमेश बाफना आदी उपस्थित होते. समीर शहा म्हणाले की, एलबीटी हटावसंदर्भात चर्चा सुरू असताना आयुक्तांनी हुकूमशाही पध्दतीने व्यापाऱ्यांविरुध्द कारवाई सुरू केली आहे. जोपर्यंत आयुक्त आपली कारवाई मागे घेत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. गणेशोत्सव तोंडावर असल्यामुळे बेमुदत बंद न पुकारता उद्या (सोमवार) लाक्षणिक बंद पुकारण्यात येणार आहे. या बंदमध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यापार बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळी विराज कोकणे म्हणाले की, शासनाच्या विरोधात यापूर्वीच आंदोलनाचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. स्थानिक स्तरावरचा हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून मिटवावा. आयुक्त आपली कारवाई मागे घेत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. या बंदमध्ये सर्व व्यापारी व उद्योजकांनी आपला सहभाग नोंदवावा.
उद्या लाक्षणिक बंद पुकारण्यात आला असून, सकाळी नऊ वाजता गणपती मंदिरापासून व्यापाऱ्यांची मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली नेण्यात येऊन सकाळी ११ वाजता ही रॅली महापालिकेवर नेण्यात येणार आहे. त्यानंतर आयुक्त अजीज कारचे यांना सर्व व्यापारी आपल्या नावाचे लेबल लावलेल्या दुकानाच्या किल्ल्या भेट देणार आहेत. हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. ‘आमचा व्यवहार तुम्हीच करा आणि कर भरा’ असा सल्ला देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)