एलबीटीवर आजपासून बहिष्कार

By Admin | Updated: September 24, 2014 01:16 IST2014-09-24T01:13:09+5:302014-09-24T01:16:11+5:30

व्यापाऱ्यांचा निर्णय : महापालिका आयुक्तांचा निषेध

Today's boycott on LBT | एलबीटीवर आजपासून बहिष्कार

एलबीटीवर आजपासून बहिष्कार

सांगली : एलबीटीप्रश्नी सुरू असलेल्या कारवाईबद्दल महापालिका आयुक्त अजिज कारचे यांचा व्यापाऱ्यांच्या बैठकीत निषेध करण्यात आला. महापालिकेने कोणतीही कारवाई केली तरी उद्या, बुधवारपासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील व्यापारी, उद्योजक एलबीटी भरणार नाहीत, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
सांगलीच्या टिळक स्मारक भवनात व्यापारी व उद्योजकांची बैठक आज, मंगळवारी रात्री पार पडली. या बैठकीत एलबीटीवर सामुदायिक बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला. एलबीटीविरोधी कृती समितीचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले की, आजवर महापालिका क्षेत्रातील व्यापारी व महापालिकेतील पदाधिकारी यांच्यात चांगले नाते होते. या नात्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आहे. ऐन गणेशोत्सवात कारवाईचे अस्त्र त्यांनी काढले. आता नवरात्रोत्सव व दिवाळीच्या तोंडावर कारवाई सुरू केली आहे.
कदाचित आयुक्तांना सांगलीतील व्यापारी, उद्योजकांना सण साजरा करू द्यायचा नसावा. त्यांची ही कृती अत्यंत चुकीची आहे. महापालिकेने एलबीटी नको, म्हणून राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. त्याप्रमाणे त्यांनी वागावे. यापुढे आयुक्तांनी कोणतीही कारवाई केल्यास व्यापारी त्याला घाबरणार नाहीत. संपूर्ण महापालिका क्षेत्रात या करावर आमचा सामुदायिक बहिष्कार राहील. ज्या व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे, विवरणपत्र भरले आहे व करही जमा केला आहे, असे सर्व व्यापारी उद्यापासून सामुदायिक बहिष्काराच्या आंदोलनात सहभागी होतील. व्यापारी, उद्योजक एकसंध असून महापालिकेच्या दडपशाहीला आम्ही जुमानणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
बैठकीस विराज कोकणे, सुदर्शन माने, मुकेश चावला, अशोक शहा, सुनील बाफना, महावीर संकपाळ, धीरेन शहा, आप्पा कोरे आदी व्यापारी उपस्थित होते.

Web Title: Today's boycott on LBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.