सातारा जेल फोडल्याच्या क्रांतिकारी घटनेस आज ७७ वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:25+5:302021-09-10T04:33:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : भारत मातेचे पुत्र क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी ब्रिटिशांच्या विरोधी केलेल्या अनेक आंदोलनांपैकी एक ...

सातारा जेल फोडल्याच्या क्रांतिकारी घटनेस आज ७७ वर्षे पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : भारत मातेचे पुत्र क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी ब्रिटिशांच्या विरोधी केलेल्या अनेक आंदोलनांपैकी एक रोमहर्षक प्रसंग म्हणजे दि. १० सप्टेंबर १९४४ रोजी सातारा येथील जेल फोडले होते. या क्रांतिकारी घटनेस ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. सातारच्या १८ फूट उंचीच्या जेल तटावरून क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांची उडी ही प्रतिसरकारच्या इतिहासातील गौरवशाली गाथा आहे.
२८ जुलै १९४४ रोजी नागनाथअण्णा यांनी निवडक सहकाऱ्यांच्या समवेत हाळभाग वाळवा येथे राष्ट्र सेवा दलाची सभा घेतली. सभेत नागनाथअण्णा म्हणाले, जमलेला समाज पाहता मला वाटते, आपल्या देशाचे स्वातंत्र्य आता दूर राहिलेले नाही. देशभरातील सामान्य जनता ब्रिटिशांच्या जुलमी सतेविरुद्ध गोळीस गोळीनेच उत्तर द्यायला रस्त्यावर आली आहे. यासाठी सर्व गावकऱ्यांनी लढण्यासाठी तयारी करून माझ्या पुढल्या निरोपाची वाट बघा आणि लढायला तयार व्हा, असे आवाहन केले व सभा संपली.
त्यानंतर ते सहकाऱ्यांसह कोटभाग वाळवा येथे नाना देसाई यांच्या घरी भोजन करून विश्रांतीकरिता थांबले. सहकारी नारायण जगदाळे हे नागनाथअण्णा यांच्या झोपलेल्या खोलीच्या दरवाजाची कडी लावायला विसरले. दरम्यान, पोलिसांच्या खबऱ्यांनी फंद फितुरीने घात केला. आष्टा पोलीस फौजदार अहमदी यांनी पोलीस सहकारी यांच्या मदतीने बेसावध झोपलेल्या नागनाथअण्णा यांना अटक केली. आष्ट्यापेक्षा इस्लामपूर जेल सुरक्षित म्हणून अण्णा यांना इस्लामपूर इथे ठेवले होते. दरम्यान, गद्दारी करणाऱ्याचा उजवा हात व डावा पाय अण्णांच्या सहकाऱ्यांनी तोडला. सहकारी भूमिगत झाले. इस्लामपूर जेल फोडून अण्णांना बाहेर काढण्यासाठी नियोजन झाले.
वाय. सी. पाटील व राजूताई पाटील यांनी केलेल्या नियोजनाची चिठ्ठी पडली. सीआयडी यांच्या हाताला लागली. पोलीस हडबडून जागे झाले व नागनाथअण्णा यांना सातारा जेलमध्ये हलविण्यात आले. त्यांना जेलमध्ये राहणे पसंत नव्हते. त्यामुळे त्यांनी जेल फोडण्याचे नियोजन केले. जेल फोडताना सापडले तर गोळीला बळी पडणार हे त्यांना माहीत होते. त्यात सातारचा जेल भक्कम, आतून १८ फूट उंच अशी भिंत होती.
एस. बी. पाटील यांनी हा जेल फोडण्याचे व जाण्याचे नियोजन केले होते. नागनाथ अण्णा यांना त्या मार्गे जेल फोडण्याचे मदत करायचे ठरले. त्याकामी नियोजन झाले. सातारा जेलमधील सर्वांना १० सप्टेंबर १९४४ रोजी अंघोळीसाठी सोडले. नियोजनाप्रमाणे काही अंघोळीसाठी गेले व बाकी पलायन करण्याच्या भिंतीजवळ गेले. दोघे भिंतीकडे तोंड करून बसले. एस. बी. पाटील त्या दोघांच्या खांद्यावर बसले. नागनाथअण्णा एस. बी. पाटील यांच्या खांद्यावर बसले. पहिली जोडी ठरल्याप्रमाणे उभी राहिली, नंतर एस. बी. पाटील व शेवटी नागनाथअण्णा उभा राहिले व भिंतीवर चढले. उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून कसलाही विचार न करता १८ फूट उंचीच्या तटावरून त्यांनी उडी मारली. तिथे बसून बारीक हरळी उपटू लागले. कुणी पाहिले व शंका आली तर हा माणूस गणपतीला हराळी, दुर्वा काढीत आहे असे वाटावे. कारण त्यावेळी घरोघरी गणपती बसविले होते. स्वातंत्र्यासाठी जिवाची पर्वा न करता जेल फोडून आलेला हा ढाण्या वाघ बंदूकधारी पोलिसांचा ससेमिरा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरी असल्याशिवाय चुकवू शकत नाही, हे जाणून होता. त्यामुळे तेथे येऊन विसावला. नागनाथअण्णा नायकवडी हयात नाहीत; पण सातारा जेल परिसरातून जाताना त्या क्रांतिकारक उडीची व सातारा जेल फोडल्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.