सांगलीत शिवसेनेच्यावतीने तिरडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:20+5:302020-12-13T04:40:20+5:30

सांगली : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध ...

Tirdi Morcha on behalf of Shiv Sena in Sangli | सांगलीत शिवसेनेच्यावतीने तिरडी मोर्चा

सांगलीत शिवसेनेच्यावतीने तिरडी मोर्चा

सांगली : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा निषेध करीत शिवसेनेने सांगलीत तिरडी मोर्चा काढला. केंद्र सरकार व भाजपच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.

शिवसेनेच्यावतीने शिवाजी मंडई येथील शिवसेना कार्यालय ते स्टेशन चौकापर्यंत केंद्र सरकारचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्टेशन चौकात जमलेल्या सर्व शिवसैनिकांनी केंद्र सरकार व भाजपविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर तिरडी मोडो आंदोलन करून भाजप सरकारचा व रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले, केंद्र सरकारने गेल्या कित्येक दिवसांत सातत्याने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमती वाढवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. नोटबंदी, जीएसटी यामुळे आधीच सर्वसामान्यांचे छोटे-मोठे व्यवसाय बुडाले आहेत आणि त्यातच कोरोनाने उरले सुरले सर्व छोटे-मोठे व्यवसाय व कष्टकऱ्यांचे काम हिरावले गेले. त्यातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधामध्ये जे तीन काळे कायदे केले आहे, त्याच्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन चालू असून, त्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बेताल वक्तव्य केले.

आंदोलनात उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, रावसाहेब खोचगे, मारुती पवार, सूरज पाटील, प्रशांत लेंगरे, अमोल काळे, तानाजी सातपुते, महेंद्र चंडाळे, हरी लेंगरे, रुपेश मोकाशी, अनिल बाबर, संजय चव्हाण, संजय देसाई, पप्पू शिंदे, संदीप ताटे, सनत पाटील, संतोष पाटील, सारंग पवार, दादा जगताप आदी सहभागी झाले होते.

चौकट

जिल्ह्यात फिरकू देणार नाही

रावसाहेब दानवे यांनी भारतातील तमाम शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अन्यथा शिवसेना सांगली जिल्ह्यात रावसाहेब दानवेंना पाय ठेवू देणार नाही. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द न केल्यास सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावात भाजप सरकारच्या विरोधात श्राद्ध आंदोलन केले जाईल, असा इशाार विभुते यांनी दिला.

Web Title: Tirdi Morcha on behalf of Shiv Sena in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.