सांगलीत गोदाम फोडून तीन लाखांचे कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक, एक लाखांचा माल जप्त
By शरद जाधव | Updated: November 22, 2023 20:30 IST2023-11-22T20:28:23+5:302023-11-22T20:30:32+5:30
गणपती पेठेत दिनानाथ नाट्यगृहाजवळ मुमताज अब्दुलरेहमान शेख (रा. हरिपूर रोड,सांगली) यांचे कपड्यांचे गोदाम आहे.

सांगलीत गोदाम फोडून तीन लाखांचे कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक, एक लाखांचा माल जप्त
सांगली : शहरातील गणपती पेठ परिसरातील बंद गोदाम फोडून त्यातील रेडिमेड कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी जेरबंद केले. रंजना सुरेश घाडगे (वय ४०), सुनिता संदीप घाडगे (४२) आणि सुनिता भारत जाधव (३९, तिघीही रा. गोसावी गल्ली, खणभाग, सांगली) असे संशयिताचे नाव आहे.
गणपती पेठेत दिनानाथ नाट्यगृहाजवळ मुमताज अब्दुलरेहमान शेख (रा. हरिपूर रोड,सांगली) यांचे कपड्यांचे गोदाम आहे. यात लहान मुलांचे रेडीमेड कपडे ठेवण्यात आली होती. चारट्यांनी गोदाम फोडून आतील दोन लाख ६३ हजार ३६७ रुपये किंमतीचे कपडे लंपास केले होते. सांगली शहर पोलिसांनी तपास करताना अवघ्या २४ तासात संशयित महिलांना जेरबंद करत मालही जप्त केला. शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना महिती मिळाली की, संशयित या चोरीचे कपडे विक्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पथकाने जावून तपासणी केली असता, कपड्यांची पोती आढळून आली. यानंतर पोलिस तपासणीत महिलांनी चोरीची कबुली दिली.
तीनही महिला पहिल्यांदाच पोलिस रेकॉर्डवर आल्या असून, त्यांनी आणखीही चोऱ्या, घरफोड्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनााखाली महादेव पोवार, प्रवीण शिरसाट, संदीप पाटील, योगेश पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.