सांगली : जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने याप्रकरणी तीन ग्रामसेविका, पाच आरोग्य सेविका आणि एक महिला शिपाई अशा नऊ जणींना नोटिसा काढल्या आहेत.त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. संबंधितांचा खुलासा घेऊन लवकरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सरकारी सेवेत असूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचा शोध महिला व बालविकास विभाग घेत आहे. पहिल्या टप्प्यातील कार्यवाहीत राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या सेवेत असलेल्या १ हजार १८३ महिला कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये सांगली जिल्हा परिषदेच्या नऊ जणींचा समावेश आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.
सरकारी सेवेत असतानाही घेतला लाभसरकारी सेवेत असतानाही त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज केल्याचे आणि योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. महिला व बालविकास विभागाने या महिलांची यादी सर्व जिल्हा परिषदांना पाठवली आहे. सांगली जिल्हा परिषदेत अशा नऊ महिला कर्मचारी आढळल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटीस देण्याची कार्यवाही सुरू आहे. पुढील सात ते दहा दिवसांत खुलासा घेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.