वखारभागात तीन दुकाने फोडणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST2021-06-30T04:18:06+5:302021-06-30T04:18:06+5:30
सांगली : शहरातील वखारभाग परिसरात तीन दुकानात चोरी करणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. समर्थ भारत पवार ...

वखारभागात तीन दुकाने फोडणारा जेरबंद
सांगली : शहरातील वखारभाग परिसरात तीन दुकानात चोरी करणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. समर्थ भारत पवार (वय २१, रा. जुना बुधगाव रस्ता, इंगोले प्लॉट, सांगली) असे त्याचे नाव आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचा साथीदार रोहित सपाटे पसार झाला आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहायक निरीक्षक रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. शहरातील वखारभाग परिसरात पथक गस्तीवर असताना एकजण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार संदीप पाटील व संतोष गळवे यांना मिळाली. पथकाने वखारभागात छापा टाकला. त्यावेळी समर्थ पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता तो आणि त्याचा साथीदार रोहित सपाटे या दोघांनी पंधरा दिवसांपूर्वी वखारभागातील तीन दुकानांत चोरून करून पैसे, चांदीची नाणी, तेलाचा डबा, कागदपत्रे चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पैसे आणि चांदीची नाणी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इतर मुद्देमाल साथीदार सपाटे याच्याकडे असल्याचे त्याने कबुली दिली. शहर पोलीस अधिक तपास करत आहे. कारवाईत उपनिरीक्षक दिलीप ढेरे, संदीप गुरव, सागर टिंगरे, राहुल जाधव, अनिल कोळेकर, सुहैल कार्तियानी यांचा सहभाग होता.