तीन मंत्र्यांनी जनतेचा आवाज दडपला

By Admin | Updated: August 24, 2014 22:36 IST2014-08-24T22:22:24+5:302014-08-24T22:36:12+5:30

संजय पाटील : भिलवडी येथे स्वाभिमानीच्या मेळाव्यात प्रतिपादन

Three ministers dumped the voice of the people | तीन मंत्र्यांनी जनतेचा आवाज दडपला

तीन मंत्र्यांनी जनतेचा आवाज दडपला

भिलवडी : गृहमंत्री आर. आर. पाटील, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील या तीन मंत्र्यांनी खुर्च्या सांभाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सामान्य जनतेचा आवाज दडपलाय. लाल दिव्याच्या गाड्या टिकविण्यासाठी तिघांनी जिल्ह्याचे राजकारण मॅच फिक्सिंगचा धंदा बनवून टाकले असल्याची टीका खासदार संजय पाटील यांनी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने भिलवडी येथे आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. राजू शेट्टी होते. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील, स्वाभिमानीचे जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा उपस्थित होते.
खा. पाटील म्हणाले की, गृहमंत्र्यांना तासगाव कारखान्याच्या माध्यमातून माझी बदनामी करून मला राजकारणातून संपवायचे होते, तर वनमंत्र्यांना हा कारखाना बंद पाडून सोनहिरा व स्वत:चे दोन कारखाने चांगले चालवून तासगाव कारखाना गिळंकृत करायचा होता. मी पाप केले असते तर माझा मीच संपलो असतो. हिंमत असेल तर दोघांनी एकाच व्यासपीठावर येऊन तासगाव कारखानाप्रश्नी जनता दरबारासमोर चर्चा करावी.
राजू शेट्टी म्हणाले, सामाजिक काम करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, सतीश शेट्टी यांची हत्या करणाऱ्यांचा शोध लावू न शकणारे आर. आर. पाटील सर्वात दुबळे व हतबल गृहमंत्री आहेत. जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना आलेली सत्तेची मस्ती उतरण्याची वेळ आली आहे.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रवक्ते महेश खराडे, बी. जी. पाटील, सयाजी मोरे, सावकार मदनाईक, बाबूराव मगदूम, महादेव महिंद, महावीर चौगुले, तानाजी भोई, विनोद वाळवेकर, महावीर नवले, उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Three ministers dumped the voice of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.