जिल्ह्यात तीन उमेदवारांचे अर्ज दाखल
By Admin | Updated: September 23, 2014 23:54 IST2014-09-23T23:28:12+5:302014-09-23T23:54:50+5:30
७० अर्जांची विक्री : विधानसभा निवडणूक, उमेदवारांची संख्या नऊवर

जिल्ह्यात तीन उमेदवारांचे अर्ज दाखल
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी आज (मंगळवार) जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात ३ उमेदवारांनी ३ उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये वाळवा विधानसभा मतदारसंघात दत्तू भाऊ गावडे (अपक्ष) यांनी व शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी संजय यशवंत जाधव, शेतकरी संघटना (अपक्ष) यांनी व खानापूर विधानसभा मतदारसंघात सतीश बाबूराव लोखंडे (कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया) यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी सहाजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आता उमेदवारांची संख्या ९ झाली आहे.
मिरज, सांगली, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या विधानसभा मतदारसंघात आज एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात आज ७३ अर्जांची विक्री झाली असून, यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात १०, सांगली मतदारसंघात ९, इस्लामपूर २, शिराळा ४, पलूस-कडेगाव १६, खानापूर ९, तासगाव-कवठेमहांकाळ ११ आणि जत विधानसभा मतदारसंघात १२ अर्जांची विक्री झाली आहे.
इस्लामपूर मतदारसंघासाठी व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक यांच्यासाठी अॅड. फिरोज मगदूम यांनी उमेदवारी अर्ज घेतला. वसंतराव हिंदुराव पाटील (उरुण-इस्लामपूर) यांनीही अर्ज घेतला. (प्रतिनिधी)
सांगलीत नऊ अर्ज नेले
सांगली विधानसभेसाठी आजच्या तिसऱ्यादिवशी सातजणांनी ९ अर्ज नेले. अर्ज नेणाऱ्यांमध्ये अजित अडवाणी, नानासाहेब बंडगर, मीनाक्षी पाटील, स्वाती शिंदे, श्रीनिवास पाटील, असीफ बावा, अस्मिता पाटील यांचा समावेश आहे.