लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊन काळात रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला असताना अनेकांच्या पोटाची चिंता मिटवण्याचे काम जिल्ह्यातील २२ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून सुरु आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे केंद्रांना वेळेत अनुदानाचा लाभ मिळत असल्याने ही योजना सुरळीत सुरु आहे.
जिल्ह्यात या केंद्रांवरून ३ हजार थाळ्या भोजन दिले जाते. सांगली जिल्ह्यात सर्वत्र शिवभोजन केंद्रे व्यवस्थित कार्यान्वित आहेत. गरजू लोकांना यापूर्वी दहा रुपयात जेवण देण्याची ही योजना हाेती. आता या थाळ्या मोफत दिल्या जाणार आहेत. एप्रिल २०२१पासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली. त्यामुळे रोजगार गेला तरी पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी आणलेली ही योजना उपयोगी ठरत आहे. दररोज ३ हजार लोक या योजनेचा लाभ घेत आहेत.
सर्व केंद्रांवर दुपारी २ वाजेपर्यंत थाळ्या संपलेल्या असतात. लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे अनेकांचा रोजगार या काळात बुडणार आहे. अशावेळी पोटासाठी या शिवभोजन थाळीचा आधार कष्टकरी व गरजू लोकांना मिळत आहे.
कोट
वेळेत अनुदान, प्रशासनाचे सहकार्य
सध्या एप्रिल महिन्यापर्यंतचे अनुदान मिळाले आहे. प्रशासनाकडून अत्यंत चांगले सहकार्य मिळत आहे. अनुदान कधीही प्रलंबित राहिले नाही. त्यामुळे योजना सुरळीतपणे सुरु आहे.
- विनायक रुपनर, केंद्रचालक
कोट
जिल्ह्यात एकाही केंद्राचे अनुदान थकलेले नाही. एप्रिलपर्यंतच्या अनुदानाचे वाटप झाले आहे. योजनेंतर्गत अनुदान वेळेत मिळते. मे महिन्याचे अनुदानही लवकरच मिळेल. त्यामुळे योजनेसमोर कोणत्याही अडचणी नाहीत.
- वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली
चौकट
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र २२
दररोज थाळीचा लाभ घेणारे लोक ३०००
चौकट
प्रती थाळी ४० व ५० रुपये अनुदान
शिवभोजन थाळी महापालिका क्षेत्रात असेल तर त्या केंद्राला प्रती थाळी ५० रुपये अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील थाळीमागे ४० रुपये अनुदान दिले जात आहे. मागील आर्थिक वर्षात थाळीचा लाभ घेणाऱ्यांकडून १० रुपये घेऊन उर्वरित रकमेचे शासन अनुदान देत होते. ही योजना आता पूर्ण मोफत झाली आहे.
केंद्रचालकांकडून गरजूंसाठी पदरमोडही
दररोज दुपारी १२ ते २ यावेळेत शिवभोजन थाळी दिली जाते. अनेक केंद्रांवर दुपारी २ पूर्वीच थाळ्या संपलेल्या असतात. अनेक केंद्रचालक त्यांच्याकडील कोटा संपल्यानंतरही स्वखर्चातून गरजूंना भोजन व अन्य खाद्यपदार्थ देत असतात. याचे वारंवार दर्शन घडते.