तब्बल साडेसहा हजार वीज जोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:53 PM2020-02-08T12:53:59+5:302020-02-08T12:56:04+5:30

सांगली जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या ८५९६ वीज जोडण्यांसाठी ठेकेदारांकडे कामाची जबाबदारी देऊनही त्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. मागील दीड वर्षात केवळ २१०६ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत.

Thousands and thousands of power connections pending | तब्बल साडेसहा हजार वीज जोडण्या प्रलंबित

तब्बल साडेसहा हजार वीज जोडण्या प्रलंबित

Next
ठळक मुद्देतब्बल साडेसहा हजार वीज जोडण्या प्रलंबित आठ वर्षे शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

अशोक डोंबाळे 

सांगली : जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या ८५९६ वीज जोडण्यांसाठी ठेकेदारांकडे कामाची जबाबदारी देऊनही त्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाहीत. मागील दीड वर्षात केवळ २१०६ जोडण्या पूर्ण झाल्या आहेत.

उर्वरित ६४९० शेती पंपांच्या जोडण्या केवळ ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित राहिल्या आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळेत कारवाई केली नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या चार ठेकेदारांना ठेका रद्दच्या नोटिसा पाठविल्या आहेत.

विहिरी, विंधनविहिरी खुदाई करून पाणी लागल्यानंतर शेतकऱ्यांनी रितसर पैसे भरून अर्ज दाखल केले होते. यामध्ये २०१२ ते २०१९ या वर्षातील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. १०,२३९ शेतकऱ्यांच्या वीज जोडण्यांपैकी महावितरण कंपनीने जिल्ह्यातील दि. ३१ मार्च २०१८ अखेरच्या प्रलंबित ८५९६ वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत (एचव्हीडीएस) १९८ कोटी रुपयांच्या ५६ निविदा मागविल्या होत्या.

त्यापैकी २६ निविदांना प्रतिसाद मिळाल्यामुळे १०६ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. ठेकेदारांना कामे सुरु करण्याचे लेखी आदेश दिले. पण ठेकेदारांकडून कामे सुरु करण्यास अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला.

मागील दीड वर्षात केवळ दोन हजार १०६ वीज जोडण्यांचीच कामे पूर्ण केली आहेत. उर्वरित कामे ठेकेदारांनी वेळेत पूर्ण केली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरुनही त्यांची पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत.

शेतकऱ्यांचा वीज जोडणीसाठी दबाव वाढल्यामुळे सध्या महावितरणने जिल्ह्यात काम करणाऱ्या चार ठेकेदारांना, कामे वेळेत पूर्ण न केल्याने ठेका रद्दच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांना ठेकेदारांनी वेळेत उत्तरही पाठविले नाही. दि. ३१ मार्च २०१८ पूर्वीच्या जोडण्या प्रलंबित असतानाच सध्या २०१८-१९ या वर्षात ९०२ आणि २०१९-२० या वर्षात ९७४ शेतकऱ्यांनी जोडणीसाठी पैसे भरुन अर्ज केले आहेत.

सध्या महावितरणकडे १०,२३९ जोडण्या प्रलंबित आहेत. एप्रिल २०१२ मध्ये २६७ आणि २०१२-१३ या वर्षात ६१६ शेतकऱ्यांनी अर्ज करुनही त्यांना वीज जोडणी मिळाली नाही. आठ वर्षे हे शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असून त्यांना महावितरणकडून न्याय मिळाला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कारभारावर खासदार, आमदारही गप्प असल्यामुळे वीज जोडणी वेळेत मिळेल का, या चिंतेत शेतकरी आहे.

Web Title: Thousands and thousands of power connections pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.