बत्तीस हजार क्विंटल सोयाबीनची आवश्यकता
By Admin | Updated: April 23, 2015 00:09 IST2015-04-22T23:54:56+5:302015-04-23T00:09:16+5:30
१५९७५ क्विंटल उपलब्ध : शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे पेरण्याचे आवाहन

बत्तीस हजार क्विंटल सोयाबीनची आवश्यकता
सांगली : जिल्ह्यासाठी ३२ हजार क्विंटल सोयाबीनची गरज असून प्रशासनाकडे महाबीज व अन्य खासगी कंपन्यांकडून १५ हजार ९७५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित बियाणे शेतकऱ्यांनी प्रक्रिया करून स्वत:कडील वापरावे, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. एन. टी. शिसोदे यांनी केले आहे. स्वत:कडील बियाणे वापरण्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सांगली जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्व मशागतीला वेग आला आहे. उन्हाळी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून खरीप पेरण्या लवकर होण्याची शक्यता आहे. म्हणून कृषी विभागाकडून पेरणीसाठी आवश्यक बियाणांचा साठा उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. सोयाबीन बियाणांची गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून कृषी विभागाने शेतकऱ्यांकडील बियाणे प्रक्रिया करून वापरण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र असून त्यासाठी ३२ हजार क्विंटल बियाणांची गरज आहे.
यापैकी महाबीज आणि खासगी कंपन्यांकडून १५ हजार ९७५ क्विंटल बियाणांची उपलब्धता झाली आहे. उर्वरित बियाणे शेतकऱ्यांनी स्वत:कडील वापरावे. शेतात उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे म्हणून दोन वर्षासाठी वापरता येते. शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांची पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया करून उगवण क्षमताही तपासून घेण्याचे आवाहन कृषी सहसंचालक डॉ. शिसोदे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
अडीच लाख पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार
जिल्हा परिषद : आॅनलाईन मागणीनंतर निर्णय; पहिल्या दिवशीच मिळणार पुस्तके
सांगली : जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानातील पहिली ते आठवीच्या वर्गातील दोन लाख ६३ हजार विद्यार्थ्यांना शासनाने मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याच्यादृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. तालुकास्तरावरून आॅनलाईन पुस्तक मागणी नोंदविल्यानंतर पुस्तकांचे वाटप होणार आहे.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याच्यादृष्टीने शासनाने सर्व शिक्षा अभियानामधून मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून ही योजना अखंडित चालू आहे. यावर्षीही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह खासगी अनुदानातील शाळांमध्ये मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक शाळांकडून पुस्तकांची आॅनलाईन मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये दोन लाख ६३ हजार विद्यार्थीसंख्या आहे. जत तालुक्यात कन्नड शाळांची संख्या जास्त असून, तेथे १३ हजार १५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जत, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज, शिराळा, तासगाव, वाळवा आणि कडेगाव तालुक्यात दोन हजार ५८२ उर्दू शाळांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी तेवढ्याच पाठ्यपुस्तक संचांची गरज आहे. (प्रतिनिधी)