उमदी : जत तालुक्यातील पूर्वभागातील एका गावात नराधम बापानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगताच दोघींनी उमदी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.तालुक्यातील पूर्वभागातील एका गावातील हा बाप काही दिवसांपासून १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करत होता. घाबरून मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. अखेर शुक्रवारी तिने आईला हा प्रकार सांगताच तिला धक्का बसला.
तिने पीडित मुलीला घेऊन उमदी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून नराधम बापावर गुन्हा दाखल केला. ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर तत्काळ त्याला अटक करण्यात आली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.अल्पवयीन मुलीवर बापाने अत्याचार केल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. उमदी पोलिसांनी गंभीर घटना घडूनही त्याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली.