मिरजेतील चोरट्यांकडून आंध्र प्रदेशमध्ये चोऱ्या
By Admin | Updated: December 25, 2014 00:09 IST2014-12-24T22:32:28+5:302014-12-25T00:09:17+5:30
एक ताब्यात : आमदारपुत्राचा मोबाईल लंपास

मिरजेतील चोरट्यांकडून आंध्र प्रदेशमध्ये चोऱ्या
मिरज : आंध्र प्रदेशमधील तिरूपती व कडाप्पा येथे मिरजेतील चोरट्यांनी मोबाईल चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. आंध्र पोलिसांनी कडाप्पा येथून एका आमदारपुत्राच्या वाहनातून चोरलेले दोन मोबाईल मिरजेतून जप्त करून एकास ताब्यात घेतले आहे.
कडाप्पा येथील आमदारपुत्र जयराज रेड्डी यांच्या मोटारीच्या काचा फोडून ४० हजार रूपये किमतीचा सोनी कंपनीचा मोबाईल व ४५ ग्रॅम सोने दोन वर्षापूर्वी लंपास केले होते. कडाप्पा पोलीस चोरट्यांचा शोध घेत असताना, चोरी झालेल्या मोबाईलपैकी रेड्डी यांचा मोबाईल व अन्य मोबाईल मिरजेत वापरात असल्याची माहिती मिळाली. कडाप्पा पोलिसांनी मिरजेतील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आंबेडकर उद्यान परिसरात चहागाडी चालविणाऱ्या येशुदास तरूणाकडून मोबाईल हस्तगत केले. येशुदास याने समाधान नामक चोरट्याकडून मोबाईल विकत घेतल्याची कबुली दिली. एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या समाधान यानेच आंध्र प्रदेशमध्ये वारंवार चोऱ्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. समाधान फरारी झाल्याने येशुदास यास ताब्यात घेऊन कडाप्पा येथे नेण्यात आले आहे. (वार्ताहर)