दादा घराण्यात कोणतेही वाद नाहीत
By Admin | Updated: September 17, 2014 23:05 IST2014-09-17T22:59:57+5:302014-09-17T23:05:07+5:30
विशाल पाटील : सांगलीतील समर्थकांच्या बैठकीत स्पष्टोक्ती

दादा घराण्यात कोणतेही वाद नाहीत
सांगली : वसंतदादा घराण्यात कोणतेही वाद नाहीत, आम्ही एकत्रित काम करीत आहोत, विधानसभा निवडणुकीतही एकसंधपणेच लढू, अशी स्पष्टोक्ती विशाल पाटील यांनी बुधवारी मदन पाटील समर्थकांच्या बैठकीत केली. बैठकीतील त्यांच्या उपस्थितीने दादा घराण्यातील तथाकथित वादाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
सांगलीच्या विष्णुअण्णा भवनात मदन पाटील समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीत समर्थकांनी पक्षांतर्गत विरोधकांवर तसेच राष्ट्रवादी व भाजप नेत्यांवर टीका केली. तीन तास ही बैठक चालू होती. काही समर्थकांनी कार्यकर्त्यांना उपदेश व सल्ले दिले. मदन पाटील यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. मात्र मदन पाटील यांनी केवळ कार्यकर्ते व समर्थकांची मते जाणून घेतली. त्यांनी भाषण केले नाही.
शहरातील व्यापारी, उद्योजक, नगरसेवक बैठकीला उपस्थित होते. यावेळी माजी जि. प. सदस्य पी. एल. रजपूत म्हणाले की, वसंतदादा घराण्यातील वादाचा मुद्दा नेहमी उपस्थित केला जातो. वास्तविक असे कोणतेही चित्र सध्या नाही. तरीही विनाकारण अफवा पसरविल्या जात आहेत. कार्यकर्त्यांनी एकसंधपणे काम केले तर काँग्रेसला यश मिळू शकते.
उद्योजक रंगराव इरळे यांनी एलबीटीचा मुद्दा उपस्थित केला. एलबीटीप्रश्नी महापालिकेने चांगली भूमिका घेतली आहे. यातील त्रुटी दूर केल्या आहेत. काही अडेलतट्टू व्यापारी व उद्योजकांमुळे अन्य लोक वेठीस धरले जात आहेत. आपणच कर भरायचा नाही आणि पुन्हा शहराच्या विकासाच्या गप्पा मारायच्या, या गोष्टी चुकीच्या आहेत.
नगरसेवक विवेक कांबळे, हारुण शिकलगार, अनारकली कुरणे, शैलेंद्र सॅमसन, हणमंत पवार, दत्तात्रय बन्ने, व्यंकाप्पा नायकर, महंमद भोजाणी, निसार संगतरास, शेवंता वाघमारे, विजय खोत, डी. जी. मुलाणी यांनी मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)