रेठरे हरणाक्ष येथे १० हजाराच्या रकमेची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST2021-07-20T04:19:56+5:302021-07-20T04:19:56+5:30
इस्लामपूर : रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कडी-कोयंड्यासह तोडून चोरट्यांनी कपाटातील दहा हजार रुपयांच्या रोख ...

रेठरे हरणाक्ष येथे १० हजाराच्या रकमेची चोरी
इस्लामपूर : रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कडी-कोयंड्यासह तोडून चोरट्यांनी कपाटातील दहा हजार रुपयांच्या रोख रकमेची चोरी केली. हा प्रकार सोमवारी सकाळी सातच्यासुमारास उघडकीस आला.
याबाबत हेमंत चिंतामणी कलेढोणकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ते नोकरीनिमित्त बहीण आणि वडिलांसमवेत इचलकरंजी येथे वास्तव्यास आहेत. रेठरे हरणाक्ष येथे त्यांची जमीन आणि घर आहे. ९ जुलैरोजी कलेढोणकर वडिलांसह रेठरे हरणाक्ष येथे आले होते. शेतातील कामे आटोपून घेतली. त्यानंतर शेतीच्या कामासाठी असावेत म्हणून १० हजार रुपयांची रक्कम घरातील कपाटात ठेवली होती. ११ जुलैरोजी ते परत इचलकरंजीला गेले. सोमवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या नंदकिशोर ढेकळे यांनी कलेढोणकर यांच्या दरवाजाचे कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून चोरी झाल्याचे कळविले. त्यानंतर कलेढोणकर यांनी समक्ष येऊन पाहणी केल्यावर कपाटातील साहित्य विस्कटून रोख रकमेची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हवालदार उत्तम माळी अधिक तपास करत आहेत.