खरातवाडीत सव्वातीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:25 IST2021-05-16T04:25:25+5:302021-05-16T04:25:25+5:30

इस्लामपूर : खरातवाडी (ता. वाळवा) येथे तिघा चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत दोन घरांतून ३ लाख २५ हजार रुपयांच्या सोन्याच्या ...

Theft of jewelery worth Rs 25 lakh in Kharatwadi | खरातवाडीत सव्वातीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

खरातवाडीत सव्वातीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

इस्लामपूर : खरातवाडी (ता. वाळवा) येथे तिघा चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत दोन घरांतून ३ लाख २५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. हा प्रकार १५ मेच्या रात्री दोनच्या सुमारास घडला. चोरट्यांनी १३ तोळे दागिन्यांची लूट करत पोबारा केला.

याबाबत अशोक आनंदा खरात (५६, खरातवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. खरात यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना पाहण्यासाठी त्यांची विवाहित कन्या पूजा जयंत हाके मुलाला घेऊन माहेरी आली होती. त्यानंतर ती वडिलांसोबत मुक्कामी होती. १४ मे च्या रात्री दहा वाजता जेवण झाल्यावर झोपी जाण्यापूर्वी पूजा यांनी आपल्याकडील १३ तोळे दागिने पर्समधील पाकिटात ठेवून ती पर्स खुंटीला टांगून ठेवली. यामध्ये पाच तोळ्याच्या बांगड्या, पाच तोळ्याचे गंठण आणि दोन तोळ्याचा नेकलेस असे दागिने होते. यानंतर सर्वजण झोपी गेले.

दोनच्या सुमारास अशोक खरात बाथरूमला जाण्यासाठी उठले होते. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि एकजण अंधुक जागेत मोबाइलचा टॉर्च लावून थांबला होता. खरात यांनी जोराने ‘कोण आहे रे’, असा आवाज दिल्यावर त्या चोरट्याने पळ काढला. त्यापाठोपाठ घरातून दोघा चोरट्यांनी बाहेर धूम ठोकली. या तिघांच्या अंगात पांढरे हाफ बनियन आणि हाफ पॅन्ट होत्या. त्यांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत तिघांनी पलायन केले.

दरम्यान, याच गावातील धोंडीराम मारुती पाटील यांच्याही घराच्या दरवाजाची कडी काढून चोरट्यांनी तेथील अर्धा तोळे वजनाची सोन्याची अंगठी चोरली.

Web Title: Theft of jewelery worth Rs 25 lakh in Kharatwadi