पलूस : पलूस नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर-यमगर यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने चार लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पन्नास हजार रुपये रोख असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरी केला. कांचन बाबूराव कुंभार (रा. वाझर, ता. खानापूर) असे मोलकरणीचे नाव आहे. ही घटना शनिवारी दि. १९ रोजी घडली होती.पोलिसांनी अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चोरीची फिर्याद अरविंद श्रीमंत यमगर यांनी पलूस पोलिसात दिली होती. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अरविंद यमगर व मुख्य अधिकारी निर्मला यमगर हे पलूस येथील परांजपे काॅलनी येथे राहतात. शुक्रवारी, दि. १८ रोजी त्यांच्या व्यक्तिगत कामानिमित्त चार दिवस गावी गेले होते. हीच संधी साधून त्यांच्या घरात घरकाम करणारी महिला कांचन कुंभार हिने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील ३ लाख ५० हजार रुपयांचे ४ तोळ्यांचे मंगळसूत्र व रोख ५० हजार रुपयांची चोरी केली.
ही गोष्ट चार दिवसांनी घरी परतलेल्या यमगर कुटुंबीयांच्या लक्षात आली. अरविंद यमगर यांनी तत्काळ पलूस पोलिसांत धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती देऊन अज्ञातावर फिर्याद दाखल केली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने दोनच दिवसांत या चोरीच्या घटनेचा छडा लावला व संशयित महिला कांचन कुंभार हिला ताब्यात घेतले.तिने गुन्ह्याची कबुली देत रोख रक्कम व दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिस हवालदार शशिकांत माळी, प्रवीण पाटील, नितीन यादव, आलमगीर लतीफ, सुधाकर पाटील, सचिन सुतार, गणेश चव्हाण, कविता पाटील यांच्या पथकाने या घटनेचा तपास केला.