जागतिक प्रतिष्ठेची आयर्न मॅन स्पर्धा नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणार, सांगलीचे सहा तरुण स्पर्धेत
By संतोष भिसे | Updated: October 17, 2022 18:02 IST2022-10-17T18:02:03+5:302022-10-17T18:02:25+5:30
Ironman competition: अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आयर्न मॅन किताब मिळविण्यासाठी सांगलीचे सहा तरुणही स्पर्धेत उतरले आहेत.

जागतिक प्रतिष्ठेची आयर्न मॅन स्पर्धा नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणार, सांगलीचे सहा तरुण स्पर्धेत
सांगली : देशातील दुसरी हाफ आयर्न मॅन स्पर्धा गोव्यामध्ये १३ नोव्हेंबररोजी होणार आहे. स्पर्धेविषयी देशभरातील स्पर्धकांत प्रचंड उत्सुकता आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आयर्न मॅन किताब मिळविण्यासाठी सांगलीचे सहा तरुणही स्पर्धेत उतरले आहेत.
जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय असलेली आयर्न मॅन स्पर्धा भारतात प्रथमच गोव्यामध्ये २०१९ मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षे कोरोनामुळे खंड पडला. यावर्षी दुसऱ्यांदा होत आहे. स्पर्धा देशातच होत असल्याने मोठ्या संख्येने भारतीय स्पर्धक सहभागी होत आहेत, त्यात सांगलीतूनही सहाजणांचा सहभाग आहे.
आतापर्यंत परदेशातच स्पर्धा होत असल्याने मोठा खर्च सोसावा लागायचा. तेथील प्रतिकूल वातावरण, तगडे स्पर्धक यांना तोंड द्यावे लागायचे. त्यातूनही सांगलीच्या आठ स्पर्धकांनी आतापर्यंत हाफ मॅरेथॉनमध्ये आयर्न मॅन किताब पटकावला आहे. दोघेजण फुल्ल आयर्न मॅनचे मानकरी ठरले आहेत.
अशी आहे आयर्न मॅन स्पर्धा
गोव्यातील हाफ आयर्न मॅन स्पर्धेत १.९ किलोमीटर पोहणे, त्यानंतर लगेच ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेचा समावेश आहे. साडेआठ तासांत ती पूर्ण केल्यास आयर्न मॅनचा बहुमान मिळतो. पहिल्या तीन विजेत्यांना डॉलरमध्ये रोख बक्षिसे आहेत. फुल्ल आयर्न मॅन स्पर्धेसाठी दुप्पट अंतर असते.