काश्मीर, लेहमधून सांगली जिल्ह्यातील २५० पर्यटक मजल-दरमजल करीत परतले घरी
By अविनाश कोळी | Updated: May 13, 2025 16:05 IST2025-05-13T16:04:34+5:302025-05-13T16:05:09+5:30
पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला

काश्मीर, लेहमधून सांगली जिल्ह्यातील २५० पर्यटक मजल-दरमजल करीत परतले घरी
अविनाश कोळी
सांगली : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होण्यापूर्वीच देशाच्या उत्तरेकडील पर्यटन स्थळांच्या सहलीवर गेलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला. काही भागातील विमान वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीचा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरला होता. मजल-दरमजल करीत अडीचशे पर्यटकांनी घर गाठले.
जिल्ह्यातील पर्यटकांनी महिन्यापूर्वी लेह-लडाख, काश्मीर, चंदीगढ आदी भागात सहलींचे नियोजन केले होते. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पर्यटन स्थळावर पर्यटक पाेहचले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून १३ प्रवासी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये चंडीगड, अमृतसर, जयपूर, हैदराबाद, कोची, जोधपूर, राजकोट आणि सुरत या शहरांकडे जाणाऱ्या हवाई वाहतुकीचा समावेश होता.
सांगली जिल्ह्यातील ज्या पर्यटकांनी या शहरांसाठी विमानांचे बुकिंग केले होते. त्यांना ऐनवेळी ते रद्द करावे लागले. मात्र, ही सेवा बंद होण्यापूर्वी जिल्ह्यातील २५० हून अधिक प्रवासी पर्यटनस्थळी दाखल झाले होते. त्यांचा परतीचा प्रवास हवाई वाहतूक बंद झाल्याने अडचणीत आला होता.
टूर्स ॲंड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून पॅकेज त्यांनी घेतले होते. परतीच्या प्रवासाचे पर्यायी नियोजन करण्यासाठी कंपन्यांनी पर्यटकांना आणखी काही दिवस पर्यटनस्थळी थांबविले होते. दोन्ही देशांतील तणावाची स्थिती थोडी कमी झाल्यानंतर रस्ते वाहतुकीचा पर्याय त्यांनी स्वीकारला.
परतीचा प्रवास झाला त्रासदायी
वाहने बदलत कसरत करीत २५० हून अधिक प्रवाशांना घरी परतावे लागले. सहल नियोजन केलेल्या कंपन्यांनी याची व्यवस्था केली होती. मात्र, परतीचा प्रवास खूपच लांबल्याने पर्यटकांना त्रास झाला. घरी परतल्यानंतर त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
लेहमध्येच जवळपास २०० जणांचा ग्रुप अडकला होता. त्या भागातून परतीसाठी हवाई वाहतूक नसल्याने रस्ते वाहतुकीचा पर्याय स्वीकारला. त्यांना सुखरूप सांगलीला आणले. या काळात खूप कसरत करावी लागली. - मंगेश शहा, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, सांगली.