अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांमध्ये सध्या वर्चस्वाची लढाई रंगली आहे. नगराध्यक्षपदाचा वजीर आपल्याकडेच रहावा म्हणून त्यासाठीच्या खेळ्या खेळल्या जात आहेत. एकीकडे सक्षम उमेदवार शोधण्यासाठी कसरत करताना रणनीतीचा भाग म्हणून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्याचा गेमही सुरु झाला आहे.सात ते आठ वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. मतदारसंघावर वर्चस्व टिकवण्यासाठी खासदार, आमदार, माजी आमदार आणि माजी खासदारांसाठी नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांची सत्ता ताब्यात असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात होणाऱ्या उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत या सहा नगरपरिषद आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. अनेक आजी-माजी आमदार स्थानिक पातळीवर सोयीच्या युती आणि आघाड्या आखत असल्याचे दृश्य दिसत आहे.शिराळा नगरपंचायतीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक या दोन नेत्यांनी एकत्र येऊन दोन्ही राष्ट्रवादीची युती करून भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि आमदार सत्यजित देशमुख यांनी नगरपरिषदेत कमळ फुलविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शिवसेना, मनसे व उद्धवसेना यांची रसद कोणाला मिळणार यावरही समीकरणांचे यश-अपयश अवलंबून आहे.राज्यातील प्रमुख नेते असलेल्या जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेची निवडणुकीकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदावर ओबीसी पुरुष आरक्षण असून, दोन्ही आघाड्यांमध्ये गतिमान हालचालींना गती मिळाली आहे. आमदार जयंत पाटील यांना घेरण्यासाठी महायुतीमधील नेत्यांकडून घोषणा होत आहेत.मात्र, आता महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकसंधपणाचा अभाव पाहायला मिळतो. इच्छुक उमेदवारांच्या गर्दीमुळे उमेदवारी निश्चित करताना माजी मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, ॲड. चिमण डांगे, वैभव पवार या नेत्यांची कसोटी लागणार आहे.
आष्ट्यात विलासराव शिंदे गटाने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता टिकविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तर भाजपनेही जयंत पाटील यांच्या विरोधकांची मोट बांधून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सत्तास्पर्धेतील निकाल ३ डिसेंबरला समोर येणार आहे.
पलूसमध्ये काँग्रेसने पुदाले कुटुंबातील उमेदवाराला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली असून, भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. परंतु, काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांना जयंत पाटील गटाकडून किती साथ मिळेल हे त्यांच्या विजयाचा मार्ग सुलभ करणार आहे. भाजपचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी काँग्रेस विरोधी गट एकत्र करून काँग्रेससमोर आव्हान उभारण्याचा प्रयत्न केला आहे. येथे भाजपतील फुटीमुळे काँग्रेसला फायदा होईल की नाही, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
विट्यात चुरशीची निवडणूक होत असून भाजपचे माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनीही सत्ता मिळवण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.तासगावमध्ये आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजय पाटील यांच्या गटांमध्ये टक्कर आहे. भाजपने मित्रपक्षांना समाविष्ट करून निवडणुकीत रोहित पाटील आणि संजय पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित पाटील यांनी तरुणांना एकत्र करून नगरपालिकेची सत्ता मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. तर संजय पाटील आपल्या नाराज गटाची समजूत काढण्याचे प्रयत्न करत आहेत.
आटपाडी नगरपंचायतीत पहिला नगराध्यक्ष आपल्या गटाचा वाटावा यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांचे मनोमिलन होणार की नाही, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिंदेसेनेचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्रअण्णा देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, स्वाभिमानी गटाचे नेते भारत पाटील, आनंदराव पाटील आणि आरपीआयचे राजेंद्र खरात यांनीही वर्चस्व मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.जत नगरपरिषदेच्या निवडणुकीतही जोरदार स्पर्धा आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी तिरंगी निवडणुकीची शक्यता आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप आणि काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सूत्रे कशी फिरतात, त्यावरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
Web Summary : Sangli's municipal elections see a battle for supremacy between current and former MLAs. Alliances are shifting in Shirala, Urun-Islampur, and other areas. Key leaders face challenges in candidate selection. The results on December 3rd will reveal the winners.
Web Summary : सांगली नगर पालिका चुनाव में वर्तमान और पूर्व विधायकों के बीच वर्चस्व की लड़ाई है। शिरला, उरुण-इस्लामपुर और अन्य क्षेत्रों में गठबंधन बदल रहे हैं। प्रमुख नेताओं को उम्मीदवार चयन में चुनौतियों का सामना करना पड़ रहा है। 3 दिसंबर को नतीजे आएंगे।