सांगली, मिरजेतील बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटरच्या ‘आका’ एजन्सी मोकाट; जीव गेल्यावर जाग येणार का?
By अविनाश कोळी | Updated: April 28, 2025 19:25 IST2025-04-28T19:24:39+5:302025-04-28T19:25:08+5:30
कारवाईची औपचारिकता नको : घरगुती सिलिंडरचा प्रवास पुरवठा विभाग शोधणार का?

सांगली, मिरजेतील बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटरच्या ‘आका’ एजन्सी मोकाट; जीव गेल्यावर जाग येणार का?
अविनाश कोळी
सांगली : सांगली, मिरजेतील बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर्सवर जिल्हा पुरवठा विभाग व पोलिसांनी कारवाई सुरू केली असली, तरी ती औपचारिकता ठरायला नको. अधिकृत ग्राहकांसाठीचे सिलिंडर काही गॅस एजन्सींमार्फत या गॅसमाफियांपर्यंत पुरविले जात आहेत. याची चौकशी पुरवठा विभाग व पोलिस करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटर्सच्या बाजारावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत जिल्हा पुरवठा विभाग व पोलिसांमार्फत अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र, या अड्डेचालकांचा ‘आका’ म्हणून कार्यरत असणाऱ्या गॅस एजन्सी या कारवाईतून मोकाट आहेत. ग्राहकांसाठी कंपन्यांनी दिलेले सिलिंडर काळ्या बाजारात कसे विकले जातात, याची चौकशीही केली जात नाही. उत्पादक कंपन्यांनी याप्रश्नी सोयिस्कर मौन बाळगले आहे. मात्र, पुरवठा विभाग व पोलिसांकडून तरी याची पाळेमुळे खणली जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
चार ते पाच गॅस एजन्सींचा हात
सिलिंडरचा इतक्या मोठ्या प्रमाणात या अड्डेचालकांना पुरवठा करणाऱ्या एकूण चार ते पाच एजन्सीज आहेत. त्या एजन्सीचे कर्मचारी ठिकठिकाणी हे सिलिंडर उतरवितात. अड्डेचालकाची मुले ती दुचाकी व चारचाकी वाहनातून अड्ड्यावर आणतात. बेमालूमपणे ही यंत्रणा कार्यान्वित असते. अड्डे उद्ध्वस्त झाले तरी एजन्सीचालकांना कोणतीही झळ पोहोचत नाही.
मुळावर घाव घालायला हवा
कारवाई कितीही झाल्या तरी एजन्सीचालकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत नवनव्या जागा शोधून अड्डेचालक पुन्हा हा दुर्घटनांना निमंत्रण देणारा बाजार भरविणारच. एजन्सीवर कारवाई झाल्यास अड्डेचालकांचा सिलिंडर पुरवठा बंद होईल आणि आपोआप हा बाजारही कायमचा बंद होऊ शकतो. मात्र, त्याबाबत प्रशासकीय यंत्रणांनी कधीही धाडस दाखविले नाही.
नागरी वस्त्यांसह निर्जन ठिकाणी अड्डे
मिरज, सांगली व कुपवाड परिसरात भरवस्त्यांमध्ये हे गॅस बॉम्ब पेरले जातात. काही माफियांनी उपनगरांसह निर्जन स्थळांवर किंवा शेतीच्या जागेत असे अड्डे उभारले आहेत, हे कारवाईतून स्पष्ट झाले.
जीव गेल्यावर जाग येणार का?
मिरजेत वर्षभरापूर्वी बेकायदेशीर गॅस सिलिंडर भरणा केंद्रात स्फोट झाला होता. वारंवार स्फोटाच्या घटना घडत आहेत. तरीही उत्पादक कंपन्या त्यांचे सिलिंडर सापडले म्हणून चौकशी करत नाहीत. पुरवठा विभाग, पोलिसांकडून केवळ छाप्याची कारवाई होते. सिलिंडरच्या पुरवठ्याच्या यंत्रणेपर्यंत ते पोहोचत नाहीत. अशा प्रकारच्या दुर्घटनेत लोकांचा जीव गेल्यानंतर या यंत्रणांना जाग येणार का, असा सवाल सामान्य नागरिकांतून उपस्थित होत आहे.