अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर असे बदल करण्याबाबत राज्य शासनाकडून प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. इस्लामपूरचे मूळ नाव उरूण-ईश्वरपूर असे असल्याचे काहींनी दावा केला आहे. परंतु शहराचे नाव ईश्वरपूर होणार उरूण या नावाचे काय? असा सवाल उरूण परिसरातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, इस्लामपूरचे मूळ नाव ईश्वरपूर होते. म्हणूनच इस्लामपूरचे जुने नाव पुर्नसंंचयित करण्याची नागरिकांकडून जोरदार मागणी होत होती. त्यामुळेच विधानसभेत इस्लामपूरचे ईश्वरपूर करण्याचा ठराव माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांडला. त्याला राज्यशासनाने तत्काळ मंजूरी देऊन ठराव मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.इस्लामपूर सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. पूर्वीपासून शहराला उरूण-इस्लामपूर या नावाने आज ही ओळखले जाते. शहरात नगरपरिषदेची स्थापना १६ नोव्हेंबर १८५३ रोजी झाली. शहराचा इतिहास पाहता मुस्लिम समाजाची संख्या जास्त होती. यांचा पुरावा म्हणजे शहराच्या चारही बाजूनी असलेल्या पीर देवस्थानाकडून मिळतो. परंतु शहराचे मूळ नाव ईश्वरपूर होते. असे सांगितले जाते. त्यामुळेच ईश्वरपूर या नावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. परंतु शहराचे नाव ईश्वरपूर की उरूण ईश्वरपूर असे होणार का ? असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.उरूण इस्लामपूर शहर वाळवा तालुक्यातील असले तरी तालुक्यासाठी असणारे सर्व शासकीय कार्यालय इस्लामपूर मध्येच आहे. यामध्ये तहसील, प्रांत, पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस कार्यालय, फौजदारी, दिवाणी न्यायालये, अतिरिक्त जिल्हा व सत्र कार्यालय, भूमीअभिलेख कार्यालय,सिटी सव्हे कार्यालय, मुद्रांक व दस्त नोंदणी कार्यालय आदी शासकीय कार्यालयांचा समावेश आहे.तर शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या शहराचे नामकरण करण्यास यापूर्वी काही संघटनांनी विरोध केला होता. परंतु शासनाने ईश्वरपूर असे नामकरण करताच भाजप, शिवसेना आणि संघटनांनी आनंदोत्सव केला.परंतु ईश्वरपूर की उरूण ईश्वरपूर याबाबत आजही नागरिकांत संभ्रम आहे.‘उरूण ईश्वरपूर’ची मागणी दिग्विजय पाटील, सुमित पाटील, जयेश जाधव, अमोल पाटील, राजवर्धन पाटील, गणेश पाटील, सौरभ पाटील आम्ही उरूण परिसरातील नागरिक आहोत. पूर्वीपासून या शहराचे नाव उरूण इस्लामपूर आहे. तरी नवीन नामकरण होणारे नाव ‘उरूण ईश्वरपूर’ असे व्हावे, अशी आमची मागणी आहे.
Sangli: 'ईश्वरपूर की उरूण-ईश्वरपूर' नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर; इस्लामपूर नाव बदलाबाबत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:40 IST