शिरसगावच्या सौरऊर्जा प्रकल्प विरोधातील संघर्षात मित्रप्रेमाचा आदर्श; उपोषणकर्ते संभाजी मांडके यांना मुंबईच्या मित्राची साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 23:49 IST2025-01-17T23:47:01+5:302025-01-17T23:49:11+5:30
गाजावाजा न करता मंडपामागे बसून उपोषण

शिरसगावच्या सौरऊर्जा प्रकल्प विरोधातील संघर्षात मित्रप्रेमाचा आदर्श; उपोषणकर्ते संभाजी मांडके यांना मुंबईच्या मित्राची साथ
कडेगाव :प्रताप महाडिक
शिरसगाव तालुका कडेगाव येथे वृक्षतोडीच्या निषेधार्थ माजी सरपंच संभाजी मांडके यांचे उपोषण सुरू आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते देव तायडे हे मुंबईहून शिरसगावमध्ये आले आहेत. उपोषण मंडपामागे बसून त्यांचेही कोणालाही न सांगता गाजावाजा न करता उपोषण सुरू आहे.यामुळे यातून एक अनोखे उपोषण व मित्रप्रेमाची कहाणी समोर आली आहे.
शिरसगावच्या ग्रामस्थांनी डोंगर परिसरात हजारो झाडांची लागवड करून एक मानवनिर्मित अभयारण्य निर्माण करण्याचा ऐतिहासिक २०१७ मध्ये निर्धार केला होता. या उपक्रमात तत्कालीन सरपंच संभाजी मांडके आणि त्यांचे मित्र, सामाजिक कार्यकर्ते देव तायडे यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. ही मोहीम गावातील प्रत्येक घराघरात एक सकारात्मक भावना निर्माण करणारी ठरली होती.पण, आज याच गावातील गोड कामावर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली गायरान जमिनीत बेसुमार वृक्षतोड केल्याने संक्रात आली आहे.
वृक्षतोडीमुळे व्यथित
गायरान जमिनीत ३० वर्षांपूर्वी वृक्षारोपण करण्यातआले होते मात्र येथे झालेल्या वृक्षतोडीमुळे देव तायडे हे सुद्धा व्यथित झालेले आहेत.
संभाजी मांडके मागील सहा दिवसांपासून उपोषण करीत आहेत. मात्र या वृक्षतोडीचे दुःख झाल्याने त्यांचे मित्र देव तायडे यांचे उपोषण सुरू आहे.मंडपामागे बसून सुरू असलेल्या या उपोषणाच्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मित्रत्वाचा आदर्श आणि मानवतेची ओळख
संभाजी मांडके आणि देव तायडे यांच्या उपोषणाने समोर आणलेल्या या संघर्षात सामाजिक एकता, पर्यावरणाच्या रक्षणाचे महत्व, आणि आपल्या प्रिय मित्राच्या पाठीशी उभे राहण्याचा आदर्श प्रकट झाला आहे. अशा घटनांमुळे आपल्याला मानवतेची खरी ओळख मिळते.