मुहूर्ताच्या हळदीला उच्चांकी २१ हजारांचा भाव, सांगलीत पहिल्या दिवशी चार हजार पोत्यांची आवक
By अशोक डोंबाळे | Updated: February 4, 2025 18:34 IST2025-02-04T18:33:55+5:302025-02-04T18:34:55+5:30
उत्पादनात घट येण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज

मुहूर्ताच्या हळदीला उच्चांकी २१ हजारांचा भाव, सांगलीत पहिल्या दिवशी चार हजार पोत्यांची आवक
सांगली : सांगलीबाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डात मंगळवारी नवीन राजापुरी हळद सौद्याचा शुभारंभ झाला. बावची (ता. वाळवा) येथील शेतकरी नितीन कोकाटे यांच्या हळदीला क्विंटलला २१ हजार ३०० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. यार्डात १३ हजार ५०० ते २१ हजार ३०० असा दर आहे. पहिल्याच दिवशी चार हजार पोत्यांची आवक झाली. जादा पावसामुळे हळदीच्या उत्पादनात २० ते २५ घट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
येथील मार्केट यार्डात नवीन हळद सौद्यांचा शुभांरभ जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या हस्ते बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, उपसभापती रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झाला.
मार्केट यार्डातील एका दुकानात बावचीतील नितीन कोकाटे या शेतकऱ्याच्या हळदीला प्रतिक्विंटल २१ हजार ३०० रुपये उच्चांकी दर मिळाला. मुहूर्ताच्या पहिल्या दिवशी चार हजार पोत्यांची आवक झाली. हळदीला कमीत कमी १३ हजार ५०० ते जास्तीत जास्त २१ हजार ३०० असा दर मिळत आहे.
यावेळी बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील, स्वप्नील शिंदे, बिराप्पा शिंदे, शशिकांत नागे, बसवराज बिराजदार, प्रशांत पाटील, काडापा वारद, मारुती बंडगर, माजी सभापती सिकंदर जमादार, सचिव महेश चव्हाण, उपसचिव नितीन कोळसे, ‘चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष अमरसिंह देसाई, हळद खरेदीदार, अडते, शेतकरी, हमाल, तोलाईदार उपस्थित होते.
तारण कर्जयोजनेत सहभागी व्हा : सुजय शिंदे
सांगलीतील मार्केट यार्डात हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपली जास्तीत जास्त हळद विक्रीसाठी आणावी. शेतकऱ्यांसाठी चालू असणारी शासनाची हळद व बेदाणा शेतमाल तारण कर्जयोजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.