सांगली : 'आपले सरकार' सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांचे चलन शुल्क दुपटीने वाढविण्यात आले आहे. नॉन क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्रासाठी १२८, तर रहिवाशांसह इतरांसाठी ६९ रुपये मोजावे लागणार आहेत. हे दर दुपटीने वाढले आहेत. शैक्षणिक वर्षाच्या तोंडावर साडेसहा वर्षांनंतर ही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार असल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.जिल्ह्यातील गावोगावी आपले सरकार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. या केंद्रांच्या माध्यमातून प्रमाणपत्र, जात उत्पन्न, राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमिलेअर, रहिवासी आदी प्रकारची दाखले वितरित केली जातात. त्यातच ५ मे रोजी बारावीचा निकाल लागला आहे, तर दहावीचा निकाल या आठवड्यात लागणार आहे. त्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना वरील प्रमाणपत्रांची गरज असते.शिवाय, विविध प्रकारची प्रतिज्ञापत्र भरून द्यावी लागतात. या काळात आपले सरकार केंद्र, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रामध्ये पालकांची, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, आता ऐन प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावर आपले सरकार सेवा केंद्रातील प्रमाणपत्रांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.
नवीन दराची आकारणी २५ एप्रिलपासून सुरू
- या आधी २००८ मध्ये एका प्रमाणपत्रासाठी २० रुपये लागत होते. वाढती महागाई, जागेचे भाडे, विजेचे बिल, संगणक व प्रिंटरची देखभाल दुरुस्ती यामुळे दरात २०१८ मध्ये वाढ केली होती.
- आता शासनाने पुन्हा हे दर तीन दुपटीने वाढविले आहेत. त्यामुळे सामान्यांना मोठा फटका बसला आहे.
- शहर आणि जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये वाढीव दराची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
- जिल्ह्यात २५ एप्रिलपासूनच नव्या दराने शुल्क आकारणी सुरू झाली आहे.
शासनाकडूनच दरात वाढजिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे आपले सरकार केंद्राच्या सेवा शुल्कात वाढ केल्याबद्दल विचारणा केली. यावेळी त्यांनी राज्य शासनाकडूनच सेवा शुल्कात वाढ केली असून, २५ एप्रिलपासूनच त्याची अंमलबजावणी केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दुप्पट शुल्क वाढमहागाईने सर्वसामान्य नागरिक बेजार झाला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना शासनाकडून आधार मिळण्याऐवजी आता आपले सरकारच्या सेवा दरात दुपटीहून अधिक वाढ केली आहे. या शुल्क वाढीचा सर्वसामान्यांना पुन्हा आर्थिक फटका बसणार आहे.
प्रमाणपत्र | जुने दर | नवीन दर |
जात प्रमाणपत्र | ५७.२० | १२८ |
नॉन क्रिमिलेअर | ५७.२० | १२८ |
उत्पन्न | ३३.६० | ६९ |
रहिवासी | ३३.६० | ६९ |
नॅशनॅलिटी | ३३.६० | ६९ |
एसईसी | ३३.६० | ६९ |