स्फोटासारख्या आवाजाने विटा शहर हादरले, भूकंपासारखी जमीनही हादरली; नागरिकांची उडाली धावपळ
By श्रीनिवास नागे | Updated: September 5, 2022 18:40 IST2022-09-05T18:39:44+5:302022-09-05T18:40:15+5:30
वीज पडल्याचा अंदाज करीत नागरिकांनी शिवाजी चौकात मोठी गर्दी केली

स्फोटासारख्या आवाजाने विटा शहर हादरले, भूकंपासारखी जमीनही हादरली; नागरिकांची उडाली धावपळ
विटा (सांगली) : विटा शहरात आज, सोमवारी दुपारी दोन वाजता अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाल्याने शहर हादरले. या अचानक घडलेल्या प्रकाराने नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, वीज पडल्याचा अंदाज करीत नागरिकांनी शिवाजी चौकात मोठी गर्दी केली.
आज, दुपारी अचानक मोठा आवाज झाला. त्यावेळी शहरातील मुख्य शिवाजी चौकापासून लांबपर्यंत विजेसारखा लखलखता प्रकाश पडला. त्यामुळे वीज पडल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. परंतु, हा आवाज इतका मोठा होता की, अनेक दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या आवाजामुळे काही सेकंद भूकंपासारखी जमीन हादरली.
शहरात सोमवारी आठवडा बाजार असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होती. दुपारी दोन वाजता अचानक वीज पडल्यासारखा आवाज झाल्याने नागरिक चांगलेच भयभीत होऊन मिळेल त्या दिशेने धावू लागले. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनाही स्फोटासारखा आवाज झाला; परंतु कशामुळे आवाज झाला याची माहिती अद्याप नसल्याचे सांगितले.
दरम्यान, विटा शहरातील शिवाजी चौकात इमारतीवर असलेल्या मोबाईल टॉवरवर वीज पडली असावी, अशी चर्चा नागरिकांत सुरू होती.