सांगली : विटा येथील ॲड. विशाल कुंभार यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणाची सुनावणी प्रथमच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर मंगळवारी झाली. यावेळी विटा पोलिसांचे कृत्य गंभीर असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. यावेळी पोलिसांनी न्यायालयापुढे माफी मागण्याची तयारी दर्शविली.विटा येथील वकील मारहाण प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या न्यायालयात झाली. कुंभार यांच्यातर्फे ॲड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या युक्तिवादावर न्यायमूर्तींनी विटा पोलिसांचे कृत्य अत्यंत गंभीर असल्याची टिप्पणी केली. पोलिसांतर्फे सहायक सरकारी वकील वीरा शिंदे यांनी संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी माफी मागायला तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर ॲड. निकम यांनी हरकत घेत, कुंभार यांच्या दखलपात्र तक्रारीची पोलिस दखल घेत नाहीत व कुठलाही गुन्हा दाखल करत नाहीत तर दुसरीकडे त्यांच्याविरुद्ध मात्र त्याच रात्री अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करून अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेला आहे. पोलिसांची ही भूमिका दुटप्पी आहे, असे सांगितले. त्यावर न्यायालयाने कुंभार यांच्यावरील अदखलपात्र गुन्ह्यासंदर्भात काहीही हालचाल करण्यास मनाई केली. पोलिसांची या प्रकरणाबाबत काय भूमिका आहे या विषयी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार आहे.
Sangli: वकिलाला मारहाण करण्याचे विटा पोलिसांचे कृत्य गंभीर, कोल्हापूर सर्किंट बेंचची टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:19 IST