आटपाडीत बंदिस्त पाईपलाईनची चाचणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST2021-04-17T04:27:26+5:302021-04-17T04:27:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : राज्यातील बहुप्रतिक्षित असा बंदिस्त पाईपलाईनने शेतीला पाणी देण्याच्या प्रकल्पाची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. टेंभू ...

आटपाडीत बंदिस्त पाईपलाईनची चाचणी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : राज्यातील बहुप्रतिक्षित असा बंदिस्त पाईपलाईनने शेतीला पाणी देण्याच्या प्रकल्पाची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्याला कालव्याने न देता बंदिस्त पाईपलाईनने देण्याचा पथदर्शी प्रकल्प आटपाडी तालुक्यात राबविण्यात येत आहे. त्याची चाचणी सुरू झाली आहे.
तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी सुरू झाले. खरसुंडी ते हिवतड कालव्यातून हिवतड येथून तीन ठिकाणी आणि डाव्या कालव्यातून पारेकरवाडी तलावात पाणी सोडले तर बंद पाईपलाईनची जागोजागी चाचणी सुरू केली आहे. बंद पाईपलाईनची चार दिवसांपासून संबंधित कंपनीने तपासणी करून पाणी सोडण्याची चाचणी सुरू केली आहे. घाणंद वितरिकेवरील मुढेवाडी, कामत याठिकाणी चाचणी केली. तसेच खरसुंडी वितरिकेवरील बनपुरी, तडवळे, तळेवाडी येथेही चाचणी घेतली. काही ठिकाणी चाचणी यशस्वी झाली तर अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागली आहे.
ही गळती काढून चार दिवसानंतर पुन्हा चाचणी केली जाणार आहे. टेंभू योजनेचे पंप गेल्या आठवड्यात सुरू होते. आठ दिवसांपूर्वी घाणद तलावात पाणी पोहोचले होते. तलाव भरल्यानंतर मागणी असलेल्या भागासाठी कालवा आणि ओढ्याने पाणी सुरू केले आहे. खरसुंडी-हिवतड मुख्य कालव्यावर हिवतड येथून तीन ठिकाणी पाणी सोडले असून, मागणी असलेले चार बंधारे भरून पाणी बंद केले जाणार आहे. डाव्या कालव्यावरील पारेकरवाडी तलावात पाणी सुरु केले आहे. पाण्याची मागणी केलेल्या भागाला पाणी सोडण्याचे काम पाटबंधारे विभागाने सुरू केले आहे.