वाळवा : येथील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी बंद झालेल्या गळीत हंगामातील उसाच्या एफआरपीचे उर्वरित ५९४ रुपये प्रतिटनाप्रमाणे बिल दोन दिवसांत देण्याची ग्वाही सोमवारी दिली. त्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संदीप राजोबा यांनी जाहीर केले.
कारखान्याने एफआरपीप्रमाणे प्रतिटन ३०९४ रुपये द्यावेत यासाठी काही दिवसापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २८ जूनला आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. या तारखेला बिले दिली नाहीत, तर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मारकस्थळी ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले होते. त्याप्रमाणे सोमवारी ठिय्या आंदोलनासाठी तयारी सुरू झाली. दरम्यान, अध्यक्ष नायकवडी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
नायकवडी म्हणाले की, कारखाना काही तांत्रिक अडचणीमुळे आज उर्वरित ५९४ रुपये प्रतिटनाप्रमाणे बिले देऊ शकत नाही. दोन दिवसात बिले देण्याची ग्वाही देत आहे. कोरोनामुळे दीड वर्ष साखर बाजारपेठ कोलमडून पडली आहे. साखरेचा उठाव नाही, साखर गोदामे भरली आहेत. त्यातून मार्ग शोधला जात आहे. काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत, त्या दोन दिवसांत दूर झाल्या की बिले देत आहोत.
त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.