तासगावातील टंचाई भाजपनिर्मित
By Admin | Updated: August 20, 2015 22:49 IST2015-08-20T22:49:35+5:302015-08-20T22:49:35+5:30
महादेव पाटील यांचा आरोप : बैलगाड्यांसह कॉँग्रेसचा निषेध मोर्चा

तासगावातील टंचाई भाजपनिर्मित
तासगाव : तासगाव तालुक्यात निर्माण झालेली पाण्याची टंचाई ही निसर्गनिर्मित नसून, भाजपनिर्मित आहे. तालुक्यातील पाणी योजनांना पाणी सोडले, तर ही टंचाईची परिस्थिती राहणार नाही. मात्र आपल्या कारखान्याचे उसाचे पैसे न देणारे भाजपचे खासदार मात्र, शेतकऱ्यांनी पाण्याचे पैसे भरावेत, असे आवाहन साळसूदपणे करीत आहेत. जर पाणी योजना सुरू करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी दिला. तासगाव तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाकडे भाजप सरकार करीत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ तासगाव तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने शेकडो बैलगाड्यांसह आयोजित निषेध मोर्चात महादेव नाना पाटील बोलत होते. यावेळी तासगावचे नगराध्यक्ष संजय पवार उपस्थित होते.
महादेव पाटील म्हणाले, पावसाळा निम्मा संपला, मात्र समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील गाववाड्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यातील तलाव व विहिरींनी तळ गाठला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.राज्यात काँग्रेसचे सरकार असताना या भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी योजना तयार केल्या. या भागातील दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र आताचे भाजप सरकार पश्चिम महाराष्ट्रावर सूड उगवतेय का? असे विचारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तासगावच्या हक्काचे पाणी शिल्लक असताना, केवळ पैसे भरण्याचा तगादा लावून, पाणी सोडलेले नाही. मात्र भाजप सरकार हे उद्योगपतींचे सरकार आहे. त्यांचे प्रेम उद्योगपतींवरच आहे. केवळ अनुशेषाच्या नावाखाली आमच्या शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी तहसील कार्यालयाजवळ झालेल्या सभेत तासगावचे नगराध्यक्ष संजय पवार, तासगाव-कवठेमहांकाळ युवकचे अध्यक्ष महेश पाटील, नंदू मंडले, नामदेव माळी, डॉ. संतोष पाटील, बाळासाहेब डुबल यांची भाषणे झाली.
मोर्चात संताजी पाटील, भगवान कदम, विलास पवार, भास्कर डुबल, शरद जाधव, सतीश काटे, बाबूराव माळी, नीलेश पाटील, हणमंत अडसूळ, विनायक पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
तासगाव शहरातील भिलवडी नाक्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. दुष्काळाची वाढती दाहकता व तालुक्यातील बंद असलेल्या पाणी योजनांविरोधात जनतेत खदखणारा असंतोष या काँग्रेसच्या मोर्चात पहायला मिळाला. (वार्ताहर)