जिल्ह्यात सहा उमेदवारांचे दहा अर्ज
By Admin | Updated: September 23, 2014 00:13 IST2014-09-22T23:03:55+5:302014-09-23T00:13:36+5:30
जिल्ह्यात सहा उमेदवारांचे दहा अर्ज

जिल्ह्यात सहा उमेदवारांचे दहा अर्ज
सांगली : जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आज (सोमवार) सहा उमेदवारांनी १० उमेदवारी अर्ज दाखल केले. वाळवा, मिरज, जत आणि खानापूर मतदारसंघात आज अर्ज दाखल झाले. दरम्यान, आज १८४ अर्जांची विक्री झाली. वाळवा, मिरज आणि खानापूर मतदारसंघात प्रत्येकी एक, तर जत मतदारसंघात आज तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले.
मिरज मतदारसंघात उमेश श्रीरंग धेंडे (अपक्ष) यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. वाळवा मतदारसंघातून बी. जी. पाटील (अपक्ष) यांनी एक अर्ज दाखल केला. खानापूर विधानसभेसाठी भक्तराज ठिगळे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यांनी एक अर्ज मनसेतर्फे व एक अपक्ष म्हणून दाखल केला आहे. जत विधानसभा मतदारसंघात आज तीन अर्ज दाखल झाले. यामध्ये श्रीरंग पाखरे (हिंदुस्थान जनता पार्टी) व सुनील दलवाई (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला, तर बसवराज चिदानंद पाटील यांनी अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले.
सांगली, शिराळा, पलूस-कडेगाव व तासगाव मतदारसंघात अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात आज १८४ अर्जांची विक्री झाली. यामध्ये मिरजेसाठी ३१, सांगलीसाठी २२, वाळवा १८, शिराळा १८, पलूस-कडेगाव २४, खानापूर २४, तासगाव- कवठेमहांकाळ १३ व जत विधानसभेसाठी ३४ अर्जांची विक्री झाली.
जत : राष्ट्रीय बसव सेनेच्यावतीने श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार ते जत तहसील कार्यालयापर्यंत मोटारसायकल रॅलीसमवेत पदयात्रा काढून बसवराज पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मिरज : मिरज विधानसभेसाठी मजलिस इत्तेहादुल मुसलमीन या पक्षातर्फे निवृत्त सचिव उमेश धेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. १६ उमेदवारी अर्जांची आज विक्री झाली.
एमआयएमचे उमेदवार मिरज विधानसभा राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविणार असून, पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी प्रचारासाठी मिरजेत येणार असल्याचे रफिक मुल्ला यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे प्रमोद इनामदार, महेश कांबळे, काँग्रेसचे अशोक सांगलीकर, अशोक कबाडगे, दीपक कारंडे, बाळासाहेब होनमोरे, सदाशिव खाडे, दीपक दणाणे, नितीन सोनवणे, आदी १६ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. (प्रतिनिधी)
५सांगलीसाठी ५७ अर्जांची विक्री
सांगली विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी २२ अर्जांची विक्री झाली. आजअखेर ५७ अर्जांची विक्री झाली असून, अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. आज अर्ज नेणाऱ्यांमध्ये दिगंबर जाधव, शिवाजी (पप्पू) डोंगरे, विनया पाठक, अनिल शेटे, सुरेश टेंगले, तानाजी सरगर आदींचा समावेश आहे.