लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेतील अॅपेक्स केअर रुग्णालयचालक डॉ. महेश जाधव याचा भाऊ सांगलीतील मेंदू शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. मदन जाधव व तंत्रज्ञ बसवराज कांबळे या दोघांना गांधी चौक पोलिसांनी शनिवारी अटक केली. न्यायालयाने दोघांना दोन दिवस पोलीस कोठडी दिली. ‘अॅपेक्स’मधील मृत्यू प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून, पोलिसांनी आतापर्यंत दोन डाॅक्टरांसह नऊजणांना अटक केली आहे.
मिरजेतील अॅपेक्स कोविड रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव याच्या रुग्णालयात तब्बल ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने त्याला सदोष मनुष्यवधप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या रुग्णालयातील इतर सात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
डाॅ. जाधव याचा मोठा भाऊ सांगलीतील मेंदू शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. मदन जाधव व ईसीजी तंत्रज्ञ बसवराज कांबळे यांनी अॅपेक्स रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खोट्या उपचाराची कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत केल्याचे पोलिसांच्या चाैकशीत निष्पन्न झाल्याने त्यांनाही शनिवारी पोलिसांनी अटक केली.
डॉ. मदन जाधवला यापूर्वी पोलीस ठाण्यात पाचारण करुन चौकशी करण्यात आली होती. शनिवारी त्याला पोलिसांनी अटक केल्याने सांगली-मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत नऊजणांना पोलिसांनी अटक केली असून, अॅपेक्स रुग्णालयाला नियमबाह्य परवाना देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांनाही चाैकशीला तोंड द्यावे लागणार आहे.
चाैकट
महापालिका आरोग्य विभागामुळे संभ्रम
महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी नियमानुसार वैद्यकीय सुविधांची पडताळणी करूनच अॅपेक्सला परवानगी दिल्याचा दावा केला आहे. मात्र, अॅपेक्स रुग्णालय सुरु करण्यासाठी महापालिकेला केवळ एक पानी अर्ज दिला होता, या प्रस्तावाबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णालयाची तपासणी केली नव्हती, असे आरोग्य विभागाने पोलिसांना कळविल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.