नुकसानभरपाईवरील तांत्रिक ढग हटले
By Admin | Updated: June 21, 2016 01:22 IST2016-06-21T00:09:59+5:302016-06-21T01:22:52+5:30
जिल्हा बॅँक : शेतकऱ्यांच्या खात्यावर २७ कोटी रुपये झाले वर्ग

नुकसानभरपाईवरील तांत्रिक ढग हटले
सांगली : खरीप २०१५ मधील जिल्ह्यातील ६३ हजार २८८ लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विम्याच्या नुकसानभरपाईची रक्कम येत्या दोन दिवसात मिळणार आहे. तांत्रिक ढग हटल्यानंतर जिल्ह्यातील २१७ सोसायट्यांमध्ये भरपाईची रक्कम वर्ग झाली असून, येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा जमा होणार आहेत, अशी माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, नुकसानभरपाईची ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर लाभार्थींची जी यादी प्राप्त झाली त्यात अनेक त्रुटी होत्या. पूर्ण नाव नसणे, खातेक्रमांक चुकीचा असणे, एकाच नावाच्या दोन व्यक्तींमुळे झालेला गोंधळ अशा अनेक गोष्टींचे अडथळे बँकेसमोर होते. चुकीच्या पद्धतीने वाटप करण्याऐवजी खातेनिहाय शहानिशा करून या रकमा लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार आता बँकेच्या २१७ शाखांमध्ये सोमवारी रकमा वर्ग करण्यात आल्या आहेत.
आता या रकमा संबंधित शाखांकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होतील. त्यामुळे दोन दिवसात शेतकऱ्यांना या रकमा मिळण्यास आता कोणतीही अडचण राहिलेली नाही. पीकविम्याची एकूण रक्कम २७ कोटी २0 लाख ४७ हजार रुपये इतकी आहे. विमा संरक्षित रकमेच्या तुलनेत प्राप्त झालेल्या भरपाईची सरासरी टक्केवारी ५७.९0 इतकी आहे.
तालुकानिहाय भरपाईच्या टक्केवारीचा विचार केल्यास सर्वाधिक ६८.५0 टक्के भरपाई तासगाव तालुक्यातील लाभार्थींना मिळाली आहे. त्याखालोखाल जत तालुक्यात ६४ टक्के, कवठेमहांकाळमध्ये ४६.0३ टक्के भरपाई मिळाली आहे. कडेगाव तालुक्यात सर्वात कमी ४.६५ इतकी टक्केवारी आहे. याठिकाणी ५९९ शेतकऱ्यांनी ४६ लाख ८८ हजार रुपयांचा विमा उतरविला होता. यापैकी त्यांना २ लाख १९ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. त्यानंतर वाळवा तालुक्यातही ४.७६ टक्के इतकी कमी भरपाई प्राप्त झाली आहे, मात्र ठिकाणी लाभार्थींची संख्या केवळ ५ आहे. (प्रतिनिधी)