शिक्षक बँक मासिक ठेव परत देणार
By Admin | Updated: December 30, 2014 23:29 IST2014-12-30T22:47:07+5:302014-12-30T23:29:58+5:30
भारती पाटील : संचालकांच्या बैठकीत प्रस्ताव तयार

शिक्षक बँक मासिक ठेव परत देणार
सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेकडून समासदांच्या वर्गणीतून कपातीची मासिक १६ कोटीची कायम ठेव रक्कम परत देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सहकार विभागाकडे सादर केला आहे, अशी माहिती बँकेच्या अध्यक्षा भारती पाटील यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली. नूतन वर्षानिमित्त सभासदांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्व निर्णय घेतले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, चार दिवसांपूर्वी संचालक मंडळाची बैठक घेतली. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सभासदांना पुरवठा केल्या जाणाऱ्या आकस्मिक कर्जावरील अर्धा टक्का व्याजदर कमी केला आहे. कर्जदार सभासद मृत झाल्यास त्याच्या कर्जाचा बोजा जामीनदार वा वारसदार यांच्यावर राहणार नाही. यामध्ये सहा लाखापर्यंत सूट दिली जाणार आहे. १५ लाखापर्यंतच्या कर्जासाठी विमा कंपनीशी करार झाला असून, तो ऐच्छिक आहे. यासाठी लाखाला ४४ रुपये हप्ता असल्याने १०० टक्के कर्ज माफ होईल. सभासदांची मागणी व अडचण लक्षात घेऊन बिगर जामीनदार आकस्मिक कर्ज ५० हजारावरुन लाखापर्यंत करण्यात आले आहे. गत संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलेली नाही. तरी या पाच वर्षात विद्यमान संचालक मंडळाने टप्प्या-टप्प्याने ही रक्कम भरली आहे.
यावेळी समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड, शशिकांत भागवत, महेश शरनाथे, बाबा लाड, सयाजीराव पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोळपेंकडून वसुली
भारती पाटील म्हणाल्या की, गत पंचवार्षिक निवडणुकीत चुकीची माहिती देऊन शासन व सभासदांची फसवणूक केलेल्या थोरात गटाचे जगन्नाथ कोळपे यांचे संचालकपद रद्द केले आहे. त्यांनी विविध सुविधांच्या माध्यमातून घेतलेल्या साडेचार लाखांच्या वसुलीची कार्यवाही सुरु केली आहे.