टाकळी, बोलवाड, सुभाषनगरची भारत निर्माण योजना धोक्यात!
By Admin | Updated: November 22, 2014 00:01 IST2014-11-21T23:23:50+5:302014-11-22T00:01:55+5:30
पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती : ग्रामस्थांमध्ये नाराजी

टाकळी, बोलवाड, सुभाषनगरची भारत निर्माण योजना धोक्यात!
टाकळी : टाकळी, बोलवाड व सुभाषनगरच्या भारत निर्माण योजनेची चौकशी व आरोपांच्या फेऱ्यातून सुटका होत नसल्याने, ही योजना पूर्ण होऊन ग्रामस्थांचा पिण्याचा पाणीप्रश्न सुटणार, की ही योजना मृगजळ ठरणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.टाकळी, बोलवाड, सुभाषनगरची संयुक्त असलेली भारत निर्माण योजना चौकशी, आरोप-प्रत्यारोप व राजकीय साठमारीत अडकली आहे. केवळ राजकारणासाठी वापर होत असल्याने या योजनेचे भवितव्य अंध:कारमय बनले आहे. योजना आज-उद्या पूर्ण करण्याची ग्वाही हवेत विरत चालल्याने या तीनही गावांतील ग्रामस्थांवर पिण्याच्या पाण्यासाठी पाच-सहा किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली आहे. भारत निर्माण योजना लवकर पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलने केली, ग्रामसभेमध्ये पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र याचा परिणाम शून्यच.
गेल्या आठ वर्षांपासून प्रामाणिक प्रयत्नांचा अभाव व खाबूगिरी वृत्तीने योजनेची कामे पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. आम्हीच ही योजना पूर्ण करु, असे ग्रामस्थांना आवाहन करीत विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी निवडणूकही जिंकली. मात्र या कामाकडे त्यांचेही अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
सुमारे आठ वर्षांपासून टाकळी, बोलवाड, सुभाषनगर येथील ग्रामस्थ भारत निर्माण पाणी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पाच किलोमीटर मिरजेला जावे लागते. कुणी सायकलने, तर कुणी दुचाकी वाहनाने पाण्याची वाहतूक करीत असताना दिसतात. पाणी आले, मात्र ते पाणी उचलण्यासाठी लागलेले वीज बिल कोण भरणार, यावरही काही काळ चर्चा रंगली. भारत निर्माण योजनेच्या मुद्द्यावर गाजणारी टाकळीची ग्रामसभा आता शांततेत पार पडत असल्याने, ग्रामस्थांतून भारत निर्माण योजनेच्या भवितव्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. भारत निर्माण समिती भारत निर्माणची सर्व कागदपत्रे जिल्हा परिषदेकडे दिल्याचे सांगत आहे. मात्र याबाबत कोणीही पुढाकार घेऊन भारत निर्माण पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याचा आरोप सुभाषनगर येथील ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. (वार्ताहर
कामाची चौकशी करा
मध्यंतरी प्रशासनाने त्रयस्थ यंत्रणेकडून या तीन गावांच्या योजनेचा चौकशी यादीत समावेश होता, त्या चौकशीचे नेमके काय झाले, चौकशी झाली का, याबाबत गुप्तता पाळली जात असली तरी, या योजनेच्या कामाची कसून चौकशी झाल्यास, ग्रामस्थांच्या सोयीच्या असणाऱ्या या योजनेतून कोणाची सोय झाली? ठेकेदार, तांत्रिक सल्लागार की पाणी पुरवठा समिती, हे उघडकीस आलेच पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.