सांगली : जिल्ह्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि कोयना, वारणा धरणातील पाण्याचा साठाही वाढला आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून, कृष्णा आणि वारणा या नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संभाव्य पूरस्थितीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने तातडीने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हाधिकारी काकडे यांनी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीत सर्व संबंधित विभागांना सतर्क राहून वेळोवेळी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, एनडीआरएफचे टीम कमांडर सुशांत शेट्टी, दूरदृश्य प्रणालीद्वारे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, सर्व विभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिकेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून पूरबाधित भागांमध्ये नियमित संपर्क ठेवा आणि करावयाच्या उपाययोजनेची पूर्वतयारी कायम ठेवावी. गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, बालकांना प्राधान्याने मदत करणे अनिवार्य आहे. अफवा पसरविण्यापासून बचाव करण्यासाठीही कठोर खबरदारी घेण्याच्या पोलिसांना सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रशासनाकडून मूलभूत सुविधांसाठी सज्जजिल्हाधिकारी काकडे म्हणाले, कृष्णा, वारणा या नद्यांचा इशारा व धोका पातळीची नियमित तपासणी, नागरिकांच्या स्थलांतरणाचे नियोजन, भोजन, निवास व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वेळेत करणे यावर भर दिला. पशुधन आणि शेतजमिनींचे संरक्षण, पुरानंतर आरोग्य व साथीच्या रोगांबाबत औषधांची योग्य उपलब्धता ही प्राथमिकता म्हणून ठेवावी, असेही आवाहन केले.
रुग्णालये, निवारा केंद्रांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवामहसूल, पोलिस, आरोग्य, जलसंपदा व इतर विभागांनी एकत्र काम करून विजेचा पुरवठा निश्चित करावा, तर महावितरणने पूरबाधित भागांमध्ये तात्पुरता वीज पुरवठा खंडित ठेवावा. रुग्णालये व निवारा केंद्रांमध्ये वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी काकडे यांनी दिली आहे.
प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाअशोक काकडे यांनी वाहतूक विभागाला पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्याचे, अन्न व औषध प्रशासनाला निवारा केंद्रांमध्ये स्वच्छ पेयजल व निर्दोष अन्न पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून आवश्यकतेनुसार मॉक ड्रील्स घेण्याची देखील सूचना देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन नागरिकांनाही विनंती करत आहे की पावसाच्या या काळात सतर्क राहावे आणि रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात.