अहिल्यानगरला पूर्ववैमनस्यातून तिघांवर तलवार हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST2021-01-02T04:23:40+5:302021-01-02T04:23:40+5:30
कुपवाड : शहरातील अरविंद खांडेकर, विजय कोळेकर, विलास वाघमोडे (तिघेही रा. अहिल्यानगर, कुपवाड) या तिघांवर पूर्वी झालेल्या भांडणाच्या ...

अहिल्यानगरला पूर्ववैमनस्यातून तिघांवर तलवार हल्ला
कुपवाड : शहरातील अरविंद खांडेकर, विजय कोळेकर, विलास वाघमोडे (तिघेही रा. अहिल्यानगर, कुपवाड) या तिघांवर पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघांनी तलवारीने हल्ला केला. जखमींची प्रकृती चिंताजनक असून या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी संशयितांना अटक केली. बिराप्पा चनाप्पा पुजारी (वय २३), अक्षय संभाजी कोळेकर (२४), प्रवीण अशोक धायगुडे (२५, तिघेही रा. कोंडका मळा, बामणोली) अशी त्यांची नावे आहेत.
माधवनगर रस्त्यालगतच्या अहिल्यानगरमधील विजय कोळेकर यांच्या कार्यशाळेमध्ये गुरुवारी रात्री अरविंद खांडेकर, विजय कोळेकर व विलास वाघमोडे हे तिघे गप्पा मारीत बसले होते. त्यावेळी संशयित बिराप्पा पुजारी, अक्षय कोळेकर, प्रवीण धायगुडे हातात तलवार घेऊन आले. या तिघांनी मागील भांडणाचा विषय काढून तिघांवर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले. ते जखमी झाल्याचे पाहून तिघा हल्लेखोरांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयितांना तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. साहाय्यक निरीक्षक नीरज उबाळे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी काही तासांतच संशयितांना अटक केली. संशयित तिघांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.