कुपवाडमधील विवाहितेचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By Admin | Updated: March 23, 2017 18:26 IST2017-03-23T18:26:28+5:302017-03-23T18:26:28+5:30
कुपवाडमधील माधवनगर रस्त्यालगत असलेल्या प्रकाशनगरमधील वर्षा दत्तात्रय राऊत या विवाहितेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.

कुपवाडमधील विवाहितेचा स्वाइन फ्लूने मृत्यू
ऑनलाइन लोकमत
कुपवाड (सांगली), दि. 23 - कुपवाड-माधवनगर रस्त्यालगत असलेल्या प्रकाशनगरमधील वर्षा दत्तात्रय राऊत (वय ३५, रा. दुसरी गल्ली) या विवाहितेचा बुधवारी रात्री साडेअकरा वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.
प्रकाशनगरमधील वर्षा राऊत या महिलेला महिन्यापूर्वी सर्दी, ताप, अंगदुखी असा किरकोळ आजार सुरू झाल्याने नातेवाईकांनी सुरुवातीला सांगलीतील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर माधवनगर, यशवंतनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु त्यांच्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना शनिवारी वानलेसवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर पाच दिवस उपचार सुरू होते.
बुधवारी रोजी दुपारी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. तेथेच उपचार सुरू असताना बुधवारी रात्री साडेअकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू झाल्याने प्रकाशनगर परिसरात घबराट निर्माण झाली आहे.