सावर्डेत स्वप्निल पाटील यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:53+5:302021-09-06T04:30:53+5:30
तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील सिद्धेश्वर विकास सोसायटीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन खासदार संजय पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ...

सावर्डेत स्वप्निल पाटील यांचा सत्कार
तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील सिद्धेश्वर विकास सोसायटीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन खासदार संजय पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष स्वप्निल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात याेगदान देणाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक मकरंद देशपांडे, दिलीप पाटील प्रमुख उपस्थित होते. गावात कोरोना काळात काम करणाऱ्या आशा सेविका, तसेच आरोग्य सेवक, डॉक्टर यांचा कोविड योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते सिद्धेश्वर विकास सोसायटीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संजय पाटील म्हणाले, सावर्डे गाव तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. किरकाेळ गाेष्टीवरून एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा सर्वांनी मिळून तालुक्याचा विकास करावा, हीच भावना आहे.
अँड स्वप्निल पाटील म्हणाले, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर राहणार आहे. तळागाळापर्यंत जाऊन भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे काम करणार आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य शशीकांत जमदाडे, नगरसेवक जाफर मुजावर, इंद्रनील पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
आम्ही कुणा-कुणाबरोबर किती भांडावे!
आमची विरोधकांच्या बरोबर राजकीय मिलीभगत आहे, म्हणून चर्चा आहे. पण कोरोनामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत असताना त्यांना मदत करण्यासाठी पक्ष, गट, तट सोडून सामाजिक कामासाठी, प्रश्नांसाठी एकत्रित यावे लागते. शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या राजकीय सेटलमेंटच्या आरोपाला नाव न घेता खासदार संजय पाटील यांनी टोला लगाविला.