सांगली राष्ट्रवादी मुलाखतीतही स्वबळाचा नारा
By Admin | Updated: August 26, 2014 22:54 IST2014-08-26T22:27:59+5:302014-08-26T22:54:01+5:30
इच्छुकांची गर्दी : पलूस-कडेगाव वगळता सर्व मतदारसंघांसाठी मुलाखती

सांगली राष्ट्रवादी मुलाखतीतही स्वबळाचा नारा
सांगली : मुंबईत राष्ट्रवादी भवनात मंगळवारी सांगली जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. पलूस-कडेगाव मतदारसंघ वगळता अन्य सर्व मतदारसंघांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. शिराळ्याचे मानसिंगराव नाईक वगळता अन्य सर्व नेत्यांनी आज (मंगळवार) मुलाखतीला हजेरी लावली होती. मुलाखतीतही बहुतांश उमेदवारांनी आघाडीला विरोध दर्शवून स्वबळाचा मुद्दा मांडला.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, विजयसिंह मोहिते-पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. सांगली विधानसभा मतदारसंघासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, माजी नगरसेवक हरिदास पाटील, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून आर. आर. पाटील व रमेश शेंडगे, खानापूर-आटपाडीतून अमरसिंह देशमुख व जतसाठी प्रभाकर जाधव, आकाराम मासाळ, रमेश पाटील, चन्नाप्पा होर्तीकर, बसवराज पाटील यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीवेळी दावेदारी सांगतानाच इच्छुकांनी राष्ट्रवादी नेत्यांकडे स्वबळाचा मुद्दाही मांडला. पक्षाला लागलेली गळती थांबविण्यासाठी स्वबळाची घोषणा करावी, अशी मागणी बहुतांश इच्छुकांनी केली.
याबाबत आ. मानसिंगराव नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मतदारसंघात सुरू असलेल्या कार्यक्रमांमुळे मुलाखतीला जाता आले नाही. त्यासाठी दोन प्रतिनिधी व तालुकाध्यक्ष मुलाखतीसाठी गेले होते. राष्ट्रवादीकडूनच आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. कडेगाव-पलूस वगळता अन्य सर्वच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मुलाखती दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील संभ्रम वाढला आहे. काँग्रेसकडून सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी आणि जत या मतदारसंघातील इच्छुकांनी नुकत्याच मुंबईत मुलाखती दिल्या होत्या. काँग्रेसने पाच, तर राष्ट्रवादीने सात जागांसाठीच्या मुलाखती घेतल्या. (प्रतिनिधी)
सांगली विधानसभा मतदारसंघात १९८५ पासून एक अपवाद वगळता, काँग्रेसला अपयश आल्याने ही जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे घ्यावी, अशी मागणी सुरेश पाटील यांनी केली. शिराळ्याचे आ. मानसिंगराव नाईक मुलाखतीला अनुपस्थित राहिल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती.